ETV Bharat / state

'दुसऱ्यांची पोरं भाजपा कडेवर घेतं', राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा नाशिकच्या संयुक्त सभेतून महायुतीवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर झाली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

Raj Thackeray Uddhav Thackeray joint sabha
राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्रित सभा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 10:42 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक - भाजपानं तपोवनातील झाडं छाटण्याआधीच स्वतःच्या पक्षातील लोकांना छाटलं. नाशिकच्या भाजपात जुनी पक्षात काम करणारी लोकं होती. मात्र, भाजपाला दुसऱ्या पक्षातील पोरं भाड्यानं घ्यावी लागत आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. नाशिकच्या अनंत हुतात्मा कान्हेरी मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त मेळावा झाला. याप्रसंगी राज ठाकरे यांनी भाजपावर तोफ डागली.

Raj Thackeray Uddhav Thackeray
राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्रित सभा (ETV Bharat Reporter)

राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची एकत्र सभा - मुंबईसह नाशिकमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरं जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर झाली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका करत "तुमच्या भावी पिढीसाठी आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही चमत्कार घडवून दाखवू" असं आवाहन मतदारांना केलं. तसंच आम्ही दोघे भाऊ जे बोलतो ते करून दाखवतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मतदारांना शिवसेना - उबाठा आणि मनसेचे उमेदवार निवडून देण्याचं आवाहन केलं.

दुसऱ्यांची पोरं कडेवर घेतात - "भाजपाला निवडणूक घेण्यासाठी एवढा वेळ का लागला त्याचं उत्तर आतापर्यंत सरकारनं दिलं पाहिजे होतं. महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे. चुकीचा कॅरम फुटला. कोणाच्या गोट्या कोणाच्या भोकात आहे तेच कळत नाही. एका ठिकाणी उमेदवारानं एबी फॉर्म गिळून घेतला. निवडणूक खालच्या थराला गेली आहे. सत्ताधारी पक्षाचे 60-70 नगरसेवक बिनविरोध निवडून येतात. तुम्ही मतदारांना मतदानाचा अधिकार देत नाहीत. अनेकांना एक कोटी, दोन कोटी, पाच कोटी दिले जात आहेत. नाशिकमध्ये भाजपात काम करणारी जुनी माणसं होती. मात्र, भाजपाला पोरं भाड्यानं घ्यावे लागतात. दुसऱ्यांचे पोरं कडेवर घेतात. पैसे देऊन दुसऱ्या पक्षातील लोक भाजपात घेत आहेत. तपोवनातील झाडं छाटण्याच्या आधी स्वतःच्या पक्षातील लोक छाटली," असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी भाजपावर केला.

Raj Thackeray Uddhav Thackeray
सभेत बोलताना उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)

आमच्या काळात उत्तम कुंभमेळा झाला - "फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतलं. आम्ही जी कामं केली ती सर्व लोकं विसरली. दत्तक घेणारा बाप परत नाशिकला फिरकला नाही. आमच्यावेळी कुंभमेळा झाला त्यात एकही झाड कापलं गेलं नाही. मग आता का झाडं कापता? आमच्या काळात उत्तम कुंभमेळा झाला म्हणून जगभरात कौतुक झालं. उद्योगपतींसाठी तपोवनातील झाडं तोडली जात आहेत," अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

लाडक्या बहिणींचे पैसे किती दिवस पुरणार? - आमच्या काळात आम्ही केलं - "नाशिक शहराला मुकणे धरणापासून पाईपलाईन आणून पाण्याचा प्रश्न सोडवला. जीपीएसनं घंटा गाड्या सुरू केल्या. घन कचरा प्रकल्प सुरू केला. बोटॅनिकल गार्डन केलं. त्यासाठी रतन टाटांनी 15 कोटी रुपये दिले होते. आता ते सर्व सत्ताधाऱ्यांनी उध्वस्त करून टाकलं. महानगरपालिकेवर 700 कोटी रुपये कर्ज होतं. ते आम्ही कर्जमुक्त केलं. आमच्या काळात एकही भ्रष्टाचार झाला नाही. लाडकी बहीण योजनेमधून दीड हजार दिले. ते कुठे पुरणार? आज पैसे घ्याल व ते किती दिवस पुरणार? आपण मुलांचं भविष्य दावणीला लावत आहोत. आज आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही चमत्कार करून दाखवू. 100 नगरसेवक निवडून आले पाहिजे," असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

Raj Thackeray Uddhav Thackeray
सभेत बोलताना राज ठाकरे (ETV Bharat Reporter)

भाजपानं हिंदुत्वाचा बुरखा घातला - "मला आनंद होत आहे की, माझा भाऊ राज माझ्यासोबत आहे. आम्ही दोघं एकत्र आलो तर उत्कर्ष होईल. यावर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील, अनेक पराभव होऊन शिवसेना संपली नाही. सर्व भाजपाचे अंध भक्त झाले. ज्यांना राजकारणात पोरं होत नाही, त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागत आहेत. भाजपा उपटसुंभांचा पक्ष झाला आहे. भाजपा हा उपऱ्यांचा पक्ष झाला आहे, भाजपा हा दलालांचा पक्ष झाला. उद्या रावण आला तरी त्याला पक्षात घेतील. एकीकडे भाजपाने एमआयएमसोबत युती केली. दुसरीकडं कॉग्रेससोबत युती केली. भाजपा हिंदुत्वाचा बुरखा घालून तपोवन संपवत आहे. बिल्डरांसाठी तपोवनातील झाडं कापले जात आहेत. आम्ही एकत्र सत्तेसाठी आलो. विकासासाठी एकत्र आलो. मुंबईप्रमाणे नाशिकच्या महानगरपालिका शाळा चांगल्या करू. नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय करू. मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये बस सेवा करू. आम्ही दोघे भाऊ तुम्हाला वचन देतो, जे बोलतो ते करून दाखवू," अशी विविध आश्वासनं देत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर प्रहार केला.

हेही वाचा -

  1. "देवेंद्र फडणवीसांची इच्छा चांगली, पण...", मुंबईच्या मुद्द्यांवर काय म्हणाले राज ठाकरे?
  2. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा झंझावाती रोड शो: रस्त्यावर 'एकच ब्रँड ठाकरे ब्रँड'च्या घोषणा
  3. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचे प्रश्न कुठे कळतात? मूळ मुंबईकरांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा सवाल