मेळघाटच्या कुशीतील विश्रामगृहानं ब्रिटिशकाळापासून जोपासलेय गतवैभव; निसर्गप्रेमींसाठी ठरतेय पर्वणी
निसर्गाच्या कुशीत वसलेले रायपूरमधील विश्रामगृह ब्रिटिशकाळापासून दिमाखात उभे आहे. त्याभोवतालचा निसर्गरम्य परिसर हा पर्यटकांना नेहमीच खुणावतो.

Published : March 2, 2026 at 2:02 PM IST
|Updated : March 2, 2026 at 4:19 PM IST
अमरावती - सातपुडा पर्वतरांगांच्या सानिध्यात वसलेला मेळघाट परिसर निसर्ग संपन्नतेसाठी प्रसिद्ध आहे. या घनदाट जंगलात वनविभागाच्या विविध विश्रामगृहांपैकी रायपूर येथील विश्रामगृह आपले ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्य जपून आजही उभं आहे. उंच डोंगर माथ्यावर वसलेलं हे विश्रामगृह इतिहास, निसर्ग आणि स्थापत्य कलेचा सुंदर मिलाफ अनुभवण्याची संधी देतो. रायपूर येथील विश्रामगृहासंदर्भात ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट
1892 मध्ये झालं होतं बांधकाम - रायपूर येथील विश्रामगृहाची निर्मिती 1892 साली ब्रिटिश काळात करण्यात आली. सेमाडोहपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर उंच पाडावर वसलेलं हे विश्रामगृह त्या काळातील इंग्रजांच्या थंड हवेच्या ठिकाणांच्या शोधाचा एक भाग होता. जंगलातील लाकूडतोड आणि प्रशासकीय कामकाजासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी रायपूर येथे हे विश्रामगृह उभारण्यात आलं. 1963 मध्ये या इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलं. आजही या वास्तूमध्ये त्या काळातील स्थापत्यशैलीची झलक स्पष्टपणे दिसून येते.
मूलभूत सुविधा आणि निसर्ग सौंदर्य- या विश्रामगृहात दोन प्रशस्त सूटस आहेत. यासोबतच डायनिंग हॉल आणि ड्रेसिंग रूम अशा सुविधा उपलब्ध आहेत. सभोवताली घनदाट जंगल असून अनेक वर्ष जुनी वडाची झाड या विश्रामगृहाच्या परिसरात लक्ष वेधणारी आहेत. घनदाट जंगलांनी वेढलेल्या या विश्रामगृहाच्या परिसरात पक्षांचा किलबिलाट आणि निसर्गाची शांतता आगळावेगळा अनुभव देते.

मलबार पायर्ड हॉर्नबिलचं होतं दर्शन- रायपूर येथील विश्रामगृहालगतच्या जंगलाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मलबार पायड हॉर्नबिल या दुर्मीळ पक्षाचं दर्शन या परिसरात होतं. यामुळे या विश्रामगृहाला मलबार हॉर्नबिल विश्रामगृह म्हणूनही ओळखलं जातं. पक्षी निरीक्षणासाठी हा परिसर अतिशय स्वच्छ आणि समृद्ध आहे. अनेक पक्षीप्रेमी या ठिकाणी वर्षभर भेट देतात, असं मेळघाटात सामाजिक कार्य करणाऱ्या कुला फॉर ऑर्गनायझेशन या संस्थेचे अध्यक्ष राकेश महल्ले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.


- इतिहास, निसर्ग आणि शांततेचा संगम - रायपूर गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात वसलेले हे विश्रामगृह निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. प्राण्यांचे आवाज पक्षांचे दर्शन आणि थंडगार वातावरण यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा खरा आनंद अनुभवता येतो, असं राकेश महल्ले यांनी सांगितलं.

