ETV Bharat / state

नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये रंगलं हनिमून : मध्य रेल्वेनं बोगी डेकोरेट करणाऱ्यावर दाखल केला गुन्हा, मुख्य तिकीट निरीक्षक निलंबित

नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये हनिमून रंगल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी रेल्वेत अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी रेल्वे कायद्यातील विद्यमान तरतुदींनुसार डेकोरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Railways Suspends Ticket Inspector
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 11:06 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : मुंबई नागपूर नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये जोडप्याचा हनिमून रंगला. मात्र या हनिमून रंगवण्यास परवानगी देणाऱ्या मुख्य तिकीट निरीक्षकांना मध्य रेल्वे प्रशासनानं निलंबित केलं. या हनिमून सजावटीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एसी फर्स्ट-क्लास डबा फुगे आणि फुलांनी 'हनिमून सुट'प्रमाणं सजवलेला दिसत आहे. या बोगीत एक जोडपं प्रवास करत होतं. रेल्वे प्रशासनानं या घटनेची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. याव्यतिरिक्त, अनधिकृत सजावट केल्याप्रकरणी रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत सजावट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ : सोशल मीडियावर व्हिडिओ पसरल्यानंतर या घटनेकडं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं त्वरित शिस्तभंगाची कारवाई केली. सजावटीसाठी परवानगी कशी दिली गेली आणि रेल्वेचे कोणतेही नियम किंवा कार्यपद्धतींचं उल्लंघन झालं का, हे चौकशीतून स्पष्ट होईल. 'ईटीव्ही भारत'च्या (ETV Bharat) प्रश्नाला उत्तर देताना, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए. श्रीधर यांनी सांगितलं की, "महाराष्ट्रातील जालना स्थानकावर सजावट करणाऱ्या व्यक्तीचा डब्यातील प्रवेश अनधिकृत होता. याकडं एक गंभीर चूक म्हणून पाहिलं जात आहे."

विभागीय चौकशीचे आदेश : "या आधारावर, संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे आणि सविस्तर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित योग्य ती कारवाई केली जाईल. रेल्वेमध्ये अनधिकृत प्रवेश, तिकिटाशिवाय प्रवास आणि अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी रेल्वे कायद्याच्या विद्यमान तरतुदींनुसार सजावट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असंही त्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी 'नंदीग्राम एक्सप्रेस' (गाडी क्रमांक 11002) मधून प्रवास करणाऱ्या एका जोडप्यानं त्यांच्या फर्स्ट एसी कूपच्या सजावटीसाठी एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे खासगी सजावट करणाऱ्या डेकोरेटर मदत घेतली होती.

सजावट करणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू : "चौकशी सुरू आहे आणि सजावट करणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू आहे. त्याच्या जबाबाच्या आधारे, रेल्वे प्रशासन पुढील कारवाईचा निर्णय घेईल," असं एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यानं 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं. दोषी आढळणाऱ्यांवर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करेल. रेल्वे प्रशासनानं या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास पूर्ण होऊन अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर, त्यातील निष्कर्षांच्या आधारे कारवाई केली जाईल, असंही अधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचा :

  1. शिलाँगला गेलेल्या जोडप्यासारखं तुमच्यासोबतही होऊ नये म्हणून हनिमूनला जाताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
  2. Couple Died On Honeymoon : हनिमूनची रात्रच ठरली शेवटची, सकाळी अंथरुणावर सापडले नवदाम्पत्याचे मृतदेह
  3. Honeymoon Planning Mistakes : हनिमूनचे नियोजन करताना 'या' चुका करू नका, नाहीतर होईल पश्चाताप