राहुल नार्वेकर विसरलेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, संजय राऊतांचा टोला
राहुल नार्वेकर विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधलाय.

Published : January 1, 2026 at 12:13 PM IST
मुंबई : 15 तारखेला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईमधील वातावरण गरम आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होतोय. त्यावर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी हे आरोप नाही, तर सत्य आहे. राहुल नार्वेकर विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दात निशाणा साधलाय. नियम आणि संकेत पाहता अशा राजकीय कार्यक्रमात त्यांना सहभागी होऊ नये. मी पाहिलं की त्यांनी विरोधकांना धमकावले, कमळाबाईचं उपरणं टाकून त्यांच्या घरातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी ते गेले. राज्यात काय चाललंय, विचारण्याचीही सोय नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
भाजपा मुंबईमध्येही अमराठी महापौर बनवण्याच्या तयारीत : भाजपाच्या हिंदी भाषिक महापौर नियुक्तीच्या अजेंड्यावर खासदार संजय राऊत यांनी कृपाशंकर सिंहच्या वक्तव्यावरून भाजपावर टीका करत ही परिस्थिती येत्या निवडणूक प्रचारात उग्र होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. कृपाशंकर सिंह यांनी म्हटले होते की, यंदा मीरा-भाईंदरमध्ये महापौर हिंदी भाषिक उत्तर भारतीय असेल. या विधानावरून संजय राऊत यांनी मुंबईत मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचा डाव भाजपाने आखलाय, असं म्हटलंय. कृपाशंकर सिंह हा भाजपाचा बोलका पोपट आहे आणि तो अनवधानाने नाही तर जाणूनबुजून हा शब्द वापरत आहेत. भाजपा मुंबईमध्येही अमराठी महापौर बनवण्याच्या तयारीत आहेत, असा दावा त्यांनी केलाय.
भाजपाकडून मराठी माणसाच्या हिताचा निषेध : मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त जाहीरनामा उद्या जाहीर होणार आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणी संयुक्त सभाही आयोजित होतील. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्याच्या तयारीत आहेत. नवीन दमाचे नेते मेहनत घेत आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिलीय. भाजपा मराठी माणसाच्या हिताचा निषेध करत अमराठी महापौर नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. कृपाशंकर सिंह हा त्यासाठी काम करतोय आणि ही रणनीती परप्रांतीयांची मतं मिळवण्यासाठी केली जातेय. त्याचबरोबर भाजपाने काही मुस्लिम उमेदवारही काही ठिकाणी दिलेत, अशी टीका त्यांनी केलीय.
संजय राऊत यांची भाजपावर जोरदार टीका : त्याचबरोबर एबी फॉर्मसह भाजपा 5 कोटी आणि शिंदे गट 10 कोटी देत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. काही आमच्या पक्षातील सदस्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत, पण त्यांनी तमाशा केलेला नाही; काही जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, असं राऊत यांनी स्पष्ट केलंय. महापालिका निवडणुकीच्या तणावपूर्ण वातावरणात हिंदी महापौर आणि मराठी माणसाचा प्रश्न थेट राजकीय चर्चेत आलाय. संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली असून, येत्या 15 दिवसात मुंबईत महापालिका प्रचारात हा मुद्दा तापेल, असे स्पष्ट केले आहे. मनसे-उद्धव गट तयारीत असून, विविध सभांमार्फत स्थानिक मराठी हिताचे मुद्दे प्रचारात आणले जाणार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचाः

