ETV Bharat / state

राहुल गांधी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, काय आहे नेमकं पत्रात?

राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा उल्लेख आहे.

Rahul Gandhi wrote letter to CM Devendra Fadnavis
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 6:53 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई/नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा उल्लेख आहे. राहुल गांधी यांनी पुण्यात 22 ऑगस्टला 'छात्रों की गुंज' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राहुल गांधी यांना पुण्यातील मांजरी येथे सुरु असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील आंदोलक विद्यार्थिनी निशा साबळे हिने एक निवेदन दिलं होतं. ते निवेदन देखील राहुल गांधींकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी 10 दिवसांहून अधिक काळापासून उपोषण करत आहेत. पुण्यातील 'छात्रों गी गुंज' कार्यक्रमात विद्यार्थिनीनं सांगितलं की, वसतीगृहात वास्तव्यासाठी 30 वर्षांची वयोमर्दाया घालण्यात आलेली आहे. अपमानास्पद नियम लागू आहेत. मुलींसाठी प्रेग्नन्सी टेस्टसारख्या अमानवी गोष्टी लागू आहेत.

दुर्गम भागातून आलेले विद्यार्थी दान मागत नाहीयेत, ते त्यांचा अधिकार मागत आहेत. तुम्ही त्यांना व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या समस्या तत्काळ सोडवाल, अशी अपेक्षा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे. सर्पदशांमुळं मुलांचा मृत्यू होतोय. महिलांसाठीच्या सुविधांची स्थिती खराब आहे, अशा समस्या राहुल गांधी यांनी मांडल्या आहेत. विद्यार्थिनींच्या फिटनेस टेस्टच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या प्रेग्नन्सी टेस्टची माहिती मिळताच धक्का बसला, असं राहुल गांधी म्हणाले. या नियमामुळं महिलांच्या सन्मानावर आणि त्यांच्या मानवतेवर आघात होतो, असं राहुल गांधी म्हणाले.

“विद्यार्थ्यांनी अशा नियमांबद्दल माहिती दिली होती, त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचत होती आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा येत होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना माझी विनंती आहे की त्यांनी आंदोलन करणाऱ्या या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्वरित त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मांजरी या ठिकाणी शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे जवळपास वेगवेगळ्या 40 मागण्या केलेल्या आहेत. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही.

हेही वाचा -

  1. ‘मंथन फॉर युवा’तून मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा; महिला आरक्षण अन् SIR वरही भाष्यं
  2. राहुल गांधींच्या भूमिकेला सुप्रिया सुळेंचं ठाम समर्थन; पेपर लीकवरून केंद्र सरकारवर डागली तोफ
  3. ‘हा तर राजकीय कॉमेडी शो’, काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’वर भाजपाचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, ‘मी सुधरणार नाही’