बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठं रॅकेट सक्रिय, नागपुरात आणखी चौघांना अटक
बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

Published : February 28, 2026 at 9:08 AM IST
|Updated : February 28, 2026 at 9:28 AM IST
नागपूर - बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठं रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत. पेपरफुटीच्या कटात सक्रिय सहभाग असल्याच्या दाट संशयावरून नागपूर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. मनीष शंभरकर व संदीप सरडकर असे अटक झालेल्या दोघांची नावं असून, ते क्लासेसशी संबंधित आहेत. त्यामुळं या रॅकेटचे धागेदोरे किती खोलवर गेले आहेत याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय.
पोलिसांकडून कारवाई सुरू - या प्रकरणात आणखी चार आरोपींची भर पडल्यानं अटक झालेल्या आरोपींची संख्या एकूण आठ झाली आहे. ट्युशन क्लास संचालक दिनेश कोटांगले व शिक्षक प्रदीप जांगडे यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली होती, तर रात्री उशिरा मनीष शंभरकर व संदीप सरडकर यांना अटक झाली आहे.
नऊ आरोपींचा थेट सहभाग, एक अल्पवयीन - प्रदीप जांगडे यांनीच अटकेतील दिनेश कोटांगले यांना व्हॉट्सअपवर पेपर पाठवला होता. त्यानंतर दिनेश कोटांगले यांनी पेपर ट्युशन क्लासेसचे संचालक मुस्तफा खान यांना पाठवला होता. पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ आरोपींचा थेट सहभाग आढळला आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एक नाही तर तीन पेपर फोडले - 18 फेब्रुवारीला पेपरफुटीचा पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतरही तपासात आरोपींनी 21 फेब्रुवारीला झालेला गणित विषयाचा पेपर फोडल्याचं पुढं आलं. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी याला दुजोरा दिला आहे. नागपूरच्या सेंट उर्सुला हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरती 18 फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला.
मोबाईलच्या तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती उघड - एक विद्यार्थिनी वॉशरूममध्ये गेल्यानंतर बराचवेळ परत न आल्यामुळं पर्यवेक्षकांना तिच्यावर संशय आला. नंतर तिची झडती घेतली असता तिच्याकडून स्मार्टफोन जप्त करण्यात आला. मात्र, ज्यावेळी मोबाईल तपासला तेव्हा ‘XII’ नावाचा 21 सदस्य संख्या असलेला व्हॉट्सअप ग्रुप आढळला. ग्रुपवर सकाळी 10 वाजून 37 वाजताच रसायनशास्त्राचा पेपर उत्तरांसह पोस्ट करण्यात आला होता. 16 फेब्रुवारीला झालेला भौतिकशास्त्राचा पेपरसुद्धा फुटला असल्याचं समजलं. पोलिसांनी तांत्रिक तपासात आरोपीने फॉरमॅट केलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला असता गणिताचाही पेपर फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.
मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता - सध्या या प्रकरणतील मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला होता. प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झालाय. काही आरोपींनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला, तरीही 21 फेब्रुवारीला गणिताचा पेपरसुद्धा फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळालेत. मुलीच्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याचं समोर आलं. पाच सदस्यांचं विशेष तपास पथकाकडून पेपरफुटी संदर्भात डिजिटल पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असून, पेपरफुटीमागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा -

