तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन: मात्र पार्थ पवार कथित जमीन घोटाळ्याचा संबंध नाही, तर 'हे' आहे कारण
पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारावरुन कथित घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन झाल्याची चर्चा आहे.

Published : November 6, 2025 at 7:40 PM IST
|Updated : November 6, 2025 at 8:42 PM IST
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून पुण्यातील मुंढवा इथली 'महार' वतनाची जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी कथित घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणानं राज्यभर खळबळ उडाली झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं असल्याची चर्चा सुरू आहे. पण तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहारात नसून त्यांचं निलंबन हे बोपोडीच्या एका जागेच्या प्रकरणात करण्यात आलं आहे.
तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन : पुण्यातील मुंढवा इथल्या पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावानं कथित जमीन घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. आजच सूर्यकांत येवले यांचं एका दुसऱ्या प्रकरणात निलंबन करण्यात आलेलं आहे.
कोणतं आहे सूर्यकांत येवले निलंबन प्रकरण : "पुणे शहराचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी पदावर कार्यरत असताना बोपोडी येथील स.नं. 62 चे 7/12 सदरी 'अॅग्रीकल्चर डेरीकडे' असा मालकी हक्कात शासकीय विभागाचं नाव असताना देखील जाणीवपूर्वक कायदेशीर वस्तुस्थितीकडं दुर्लक्ष केलं. अनाधिकारानं मालकी हक्काबाबत अर्जदारांतर्फे आदेश दिल्याचं निदर्शनास आलं आहे. सदर आदेशान्वये शासकीय जमीन खासगी व्यक्तीस प्रदान केल्यानं शासकीय जमिनीचा अपहार झाला आहे. ही अनियमितता गंभीर स्वरूपाची असून तहसीलदार येवले यांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आणि शासकीय अधिकाऱ्याला अशोभनिय आहे. यावरून सूर्यकांत येवले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम, 1979 मधील नियम 3 चं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे. सबब, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 नुसार सूर्यकांत येवले यांच्याविरुध्द विभागीय चौकशीची कारवाई करण्यासाठी त्यांना शासनसेवेतून निलंबित करणं आवश्यक आहे," असं त्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
- अजित पवार गैरप्रकारांचं समर्थन करणार नाहीत, पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
- “70 हजार कोटी रुपये पचले म्हणून सगळं पचेल असं कोणी समजू नये,” राजू शेट्टींचा अजित पवारांवर घणाघात
- 'वतन'च्या जमिनीचा हजारो कोटींचा कथित घोटाळा? पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप; आमची जागा परत द्या, मूळ मालकांची मागणी

