ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी; पावसाने आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती

पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Pune Rain Update
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 6, 2026 at 8:23 PM IST

|

Updated : July 6, 2026 at 10:50 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागात गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं अनेक भागात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर अनेक सखल भागात पाणी साठल्यानं नागरिकांचं जीवनमान विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, मावळ, आळंदी तसंच खेड या ठिकाणी देखील दुर्दैवी घटना घडली. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानं आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 20 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.




भिंत कोसळून दहाजण जखमी - जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, "मागील चार दिवसांपासून पुण्यात पाऊस पडत असून दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. काही ठिकाणी 200 ते 250 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली. काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले होते. मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला. बचावकार्यातून तिघांना बाहेर काढण्यात आलं आहे. तर रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये देखील भिंत कोसळून दहाजण जखमी झाले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे."

माहिती देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (ETV Bharat Reporter)

20 जण जखमी - खेडमध्ये देखील पावसाच्या पाण्याने वाहून एकाचा मृत्यू झाला आहे. या दोन दिवसांच्या पावसाच्या घटनेत जिल्ह्यात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसाने पुणे, मुंबई रस्त्यावरील मिसिंग लिंक येथे देखील पावसामुळं दरड कोसळली होती. त्यामुळं हा रस्ता बंद करण्यात आला होता. आता 90 टक्के काम झालं असून लवकरच हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे, असं जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितलं.

देहू व आळंदी येथून पालखी प्रस्थान - मंगळवारी देखील हवामान विभागांनी घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. त्याच पद्धतीने श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी प्रस्थान अनुक्रमे दिनांक 7 व 8 जुलै रोजी देहू आणि आळंदी येथून होणार आहे. तरी सुरक्षतेच्यादृष्टीनं पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दी अथवा त्यापुढे पासून सहभागी व्हावे. सर्व वारकरी, भाविक, नागरिकांना अशी सूचना देण्यात आली आहे. याबाबत सर्वांनी संयम बाळगून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. तसंच उद्या पुणे शहरातील शाळा सुरू असणार असून घाटमाथ्यावरील शाळांना सुट्टी असणार आहे, असं यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा -

  1. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 24 तासांपासून ठप्प; हजारो वाहने अडकली, प्रवाशांनी व्यक्त केला संताप
  2. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम; पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली, 55 बंधारे पाण्याखाली
  3. मुंबईसह राज्यभरात कुठे अन् किती पाऊस? वारकऱ्यांना पुण्यातचं थांबण्याचं आवाहन, नाशिकला ढगफुटीचा रेड अलर्ट
Last Updated : July 6, 2026 at 10:50 PM IST