ETV Bharat / state

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणानंतर मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या अनधिकृत घरावर महापालिकेचा हातोडा

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणानंतर मोठी कारवाई करण्यात आली. मुख्य आरोपी कर्नलसिंग विरखा याच्या अनधिकृत घरावर महापालिकेने हातोडा चालवला आहे.

pune liquor tragedy accused house
फुगेवाडी विषारी दारु प्रकरणातील मुख्य आरोपीचे अनधिकृत घर पाडले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 4, 2026 at 1:26 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पिंपरी चिंचवड - शहरातील फुगेवाडी परिसरात विषारी दारू विक्री प्रकरणात नाव समोर आलेल्या कर्नलसिंग विरखा याच्या घरावर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. ज्या घरातून तो दारूची विक्री करत होता, ते अनधिकृत बांधकाम गुरुवारी महापालिकेकडून पाडण्यात येत आहे. मजूर आणि ब्रेकरच्या मदतीने ही कारवाई सुरू असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

कठोर कारवाईचा इशारा - या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. विषारी दारू प्रकरणानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

pune liquor tragedy accused house
फुगेवाडी विषारी दारु प्रकरणातील मुख्य आरोपीचे अनधिकृत घर पाडले (ETV Bharat Reporter)

आरोपीचे घर अनधिकृत - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कर्नलसिंग विरखा हा गेल्या सुमारे 45 वर्षांपासून फुगेवाडी परिसरात अनधिकृतपणे राहत होता. विशेष म्हणजे, गेल्या 40 वर्षांपासून तो या ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री करत होता. मात्र, इतक्या वर्षांत त्याने महापालिकेचा कोणताही कर भरलेला नव्हता. त्यामुळे त्याचे संपूर्ण वास्तव्य हे नियमबाह्य आणि अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले, "महापालिकेने या प्रकरणाची सखोल माहिती घेतली. संबंधित जागेची कागदपत्रे, बांधकामाची स्थिती आणि कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आली. या सर्व तपासणीनंतर हे बांधकाम पूर्णतः अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नियमांनुसार नोटीस प्रक्रिया पूर्ण करून आज प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई करण्यात येत आहे."

पोलीस बंदोबस्त तैनात - ही कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त बंदोबस्तात पाडकाम सुरू आहे. परिसरात तणाव निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

अनधिकृत बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई - दरम्यान, फुगेवाडीतील विषारी दारू प्रकरणामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर आणि अनधिकृत बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.

प्रशासनाच्या भूमिकेचे समर्थन - स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या या भूमिकेचे समर्थन केले असून, परिसरातील गुन्हेगारी आणि बेकायदेशीर व्यवसाय थांबवण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा -

  1. फुगेवाडी विषारी दारू प्रकरण : अंबादास दानवेंची पोलीस आयुक्तांशी भेट, कठोर कारवाईची मागणी
  2. 'विषारी दारु मृत्यू प्रकरण गृहखात्याचं अपयश, पुण्याच्या कारभाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा'; सुप्रिया सुळे यांची मागणी
  3. विषारी दारू प्रकरण; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाखांची मदत, अवैध धंद्यांवर मोठ्या कारवाईचा महापौरांचा इशारा