पुणे महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला; प्रत्येकाला मिळणार 'इतक्या' जागा
महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्यातील पक्ष राजकीय समीकरणं जुळवण्यात व्यस्त आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेनं (उबाठा) जागावाटप निश्चित केलंय.

Published : December 27, 2025 at 4:57 PM IST
पुणे : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी युती-आघाडी करण्यासाठी राजकीय पक्षांचा प्रयत्न असून त्याबाबत बैठका होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. पण शुक्रवारी ही चर्चा फिस्कटल्यानं पुन्हा महाविकास आघाडीची चर्चा सुरू झाली. पुणे महानगरपालिकेत एकूण 165 जागा आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 50 जागावाटप करण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. तर उर्वरित 15 जागा समविचारी पक्षांना देण्याचा निर्णय झाला आहे. तसंच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप ठरल्याची चर्चा होत आहे.
आम्ही समान जागांवर निवडणूक लढवणार : पुणे महानगरपालिकेसाठी शुक्रवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. याबाबत पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितलं की, "मागील काही दिवसांपासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून चर्चा करत होतो. महाविकास आघाडी म्हणून चर्चा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घ्यायचं की नाही याबाबत आमची चर्चा सुरू होती. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना केल्या की, भाजपासोबत जे जे सत्तेत आहेत त्यांच्यासोबत आघाडी करू नये. ही सूचना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना कळवली. यानंतर शुक्रवारी पुन्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून चर्चा केली आणि आमची प्रत्येक प्रभागानुसार चर्चा केली. आम्ही समविचारी पक्षांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढणार आहोत. मनसेला आम्ही सोबत घेणार नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. या निवडणुकीत आम्ही समान जागांवर निवडणूक लढवणार आहेत."
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली : पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा शुक्रवारी फिस्कटली. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी शरद पवारा़ंच्या पक्षाला निवडणुकीत कमी जागा दिल्या. तसंच घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली. मात्र, यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली.
हेही वाचा :
- बीडच्या युवकाची कमाल; झाडांच्या पानांवर करतोय भरतकाम, छत्रपती शिवरायांच्या साकारलेल्या छायाचित्राच्या भरतकामाची सर्वांना भुरळ
- नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी, साईनामाच्या जयघोषात भक्तीचा महापूर
- देशातील चांगल्या सुविधा देण्यात संभाजीनगर विमानतळ अव्वल, दोन वर्षांत उंचावला स्तर

