पुणे महानगरपालिका निवडणूक : "आता कुठंतरी हे सगळं थांबलं पाहिजे", आंदेकर कुटुंबीय भावनिक!
पुण्यात प्रभाग क्रमांक 23 मधून कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे.


Published : January 8, 2026 at 4:29 PM IST
|Updated : January 8, 2026 at 8:14 PM IST
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मधून कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं जोरदार टीका होताना दिसून येत आहे. अशातच आंदेकर कुटुंबीय भावनिक झाले असून आता कुठंतरी हे थांबलं पाहिजे, अशी भावना यावेळी आंदेकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा आरोप : पुणे महापालिकेच्या जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्ष असलेल्या रिपाइं खरात गटातून कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या जेलमध्ये असून त्यांचा आंदेकर कुटुंबीयांकडून प्रचार केला जात आहे. यावेळी, "जे काही झालं, ते आता कुठंतरी थांबलं पाहिजे," अशी भावना आंदेकर कुटुंबीयांकडून व्यक्त केली आहे.
आंदेकर कुटुंबीयांकडून प्रचार : प्रभाग क्रमांक 23 मध्ये आंदेकर कुटुंबीयांकडून वनराज आंदेकर हिची मुलगी रिया वनराज आंदेकर, प्रज्ञा शिवम आंदेकर, प्रियांका कृष्णराज आंदेकर यांनी प्रचाराची धुरा हातात घेतली आहे. त्या सोनाली आंदेकर हिचा प्रचार करत आहेत. यावेळी प्रज्ञा आंदेकर म्हणाल्या की, "आमच्याकडून आमच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असून आम्ही जिथं जिथं जात आहोत. तिथं तिथं आम्हाला आंदेकर कुटुंबीयांनी केलेल्या कामाची माहिती दिली जात आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासावर आम्हाला खरं उतरायचं आहे. प्रभागातील कामं तसंच नागरिकांच्या समस्या आम्हाला सोडवायच्या आहेत. जे विकास काम आमच्या कुटुंबीयांच्याकडून सुरू आहे. तेच पुढं घेऊन जायचं आहे," असंही प्रज्ञा आंदेकर यांनी सांगितलं.
वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय : याचबरोबर, सोनाली वनराज आंदेकर हिची मुलगी रिया आंदेकर म्हणाली की, "मी लहान असताना वडिलांचा प्रचार पाहिला आहे. आज आई नसताना आईचा प्रचार करायचा आहे. आज मला माझ्या वडिलांची आठवण येत आहे. माझ्या वडिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. जे काही झालं. त्याची कल्पना देखील आम्हाला नव्हती. तसंच आता हे सगळं थांबलं पाहिजे," असंही रिया आंदेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचे प्रश्न कुठे कळतात? मूळ मुंबईकरांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा सवाल
- शरद पवार हे भाजपप्रणीत एनडीएसोबत जाणार नाहीत, संजय राऊतांची रोखठोक भूमिका
- तर्रीपोहा विथ देवाभाऊ;नागपूरच्या विकासावर रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष संवाद सोहळा; शहरात 50 ठिकाणी थेट प्रक्षेपण

