पुणे महापालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकूण मालमत्ता किती?
पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेंद्र पठारे हे सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून समोर आले आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 272 कोटी रुपये आहे.

Published : January 4, 2026 at 1:35 PM IST
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून शहरातील 165 जागांसाठी तब्बल 1100 हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत अनुभवी, मातब्बर राजकारणी तसेच, पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे नवखे उमेदवारही आपलं नशीब आजमावत आहेत.
सुरेंद्र पठारे सर्वात श्रीमंत उमेदवार : यंदाच्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेंद्र पठारे हे पुण्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून समोर आले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश होता. त्यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 272 कोटी रुपये आहे.
दरम्यान, संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार सायली वांजळे यांच्या नावावर 77.65 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरेंद्र पठारे यांची एकूण मालमत्ता : भाजपा उमेदवार सुरेंद्र पठारे हे पुण्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. सुरेंद्र पठारे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता 271.85 कोटी रुपये एवढी आहे.
पठारे यांच्याकडे मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा अशा आलिशान गाड्या आहेत. त्यांची रिअल इस्टेटमध्येदेखील गुंतवणूक असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच, सुरेंद्र पठारे यांच्या नावे 1.75 किलो सोन्याचे दागिने आहेत. उच्चशिक्षित असलेले सुरेंद्र पठारे यांनी सीओईपी मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं असून ते गोल्ड मेडलिस्ट राहिले आहेत. शिक्षणानंतर त्यांनी विविध व्यवसायांमध्ये यशस्वी वाटचाल करत स्वतःची ओळख निर्माण केली. आता ते पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच, सुरेंद्र पठारे यांची पत्नी ऐश्वर्या पठारे या देखील निवडणूक लढवत आहे.
वडिलांच्या विजयात सुरेंद्र पठारे यांचा मोठा वाटा : सुरेंद्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयामध्ये सुरेंद्र यांच्या नियोजनबद्ध प्रचाराचा मोठा वाटा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. काही दिवसांपूर्वीच सुरेंद्र पठारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानं वडगाव शेरी मतदारसंघात भाजपानं पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा

