'अजित पवारांच्या गुन्हेगार उमेदवारांमुळे पुणे शहरात १०० टक्के गुन्हेगारी वाढेल'-मुरलीधर मोहोळ
पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चिंता व्यक्त केली आहे.


Published : January 2, 2026 at 11:14 AM IST
पुणे- एकीकडे पुणे शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. पण, दुसरीकडे पुण्यात जाहीर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राजकी पक्षांकडूनच गुन्हेगारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदेकर, मारणे आणि नायर यांना उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
अजित पवार यांच्या पक्षानं गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यानं शहरात गुन्हेगारी वाढणार का? असा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारलं असता त्यांनी शंभर टक्के होय, असे उत्तर दिले. कोण काय करत आहे? हे पुणेकर पाहत असल्याचं यावेळी मोहोळ यांनी सांगितलं.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यानं नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "जेव्हा पालकमंत्री सांगतात की या शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे. कोयता गँग संपली पाहिजे. पण, दुसऱ्याबाजूला पुण्याच्या पूर्व आणि पश्चिमेला त्यांची यादी पाहिली, तर हे कोणत्या तत्वात बसत हे मला माहीत नाही. प्रतिभा चोरघे यांचं गेल्या काही काळापासून सामाजिक काम हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्या स्वतःहा सामाजिक चळवळीत काम करत आहेत. चोरघे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मला माहिती नाही. परंतु गुन्हेगारांना राजकारणात स्थान नसावे. दुसऱ्या पक्षानं गुन्हेगारांना उमेदवारी दिली. परंतु आम्ही गुन्हेगारांना उमेदवारी दिली नाही".
शिवसेनेनं अधिक एबी फॉर्म का दिले?महायुतीबाबत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, "भाजपाचे १०५ नगरसेवक मागील निवडणुकीत होते. तरी आम्ही पहिल्यापासून युती करणार असल्याच सांगत होतो. शिवसेनेच्या कमी जागा असतानाही ते ठराविक संख्यापेक्षा अधिक जागा मागत होते. आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे युती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. उमेदवारी जाग बाबत मतमतांतर होते. पण आता हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही, म्हणून हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर गेला आहे. शिवसेनेनं १५० एबी फॉर्म दिले असतील तर त्याबाबत मलादेखील प्रश्न आहे. त्यांनी अधिक फॉर्म का दिले? आम्ही शिवसेनेला १६ जागा देण्यास तयार होतो. त्यावरील काही जागांचा प्रश्न असेल तर त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. आरपीआयला आम्ही ८ जागा सोडलेल्या आहे", असे मोहोळ यांनी यावेळी सांगितलं.
महिलांना आरक्षणाहून अधिक उमेदवारी- ते पुढे म्हणाले," आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषगांनं पुणे भाजप मिडिया सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या मिडिया सेंटर माध्यमातून पुढील १५ दिवस पक्षाच्या वतीनं अधिकृत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येईल. भाजपा, शिवसेना आणि आरपीआयची निवडणुकीत युती आहे. पक्षांनी ठराविक जागेपेक्षा एबी फॉर्म अधिक उमेदवार यांना दिली आहे. युती टिकली पाहिजे, अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानुसार सर्व चर्चा आणि प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ९२ महिलांना उमेदवारी दिली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण नुसार ८३ उमेदवारी दिली पाहिजे. परंतु आम्ही महिला उमेदवारांना प्राधान्य दिलं आहे", असंदेखील यावेळी मोहोळ म्हणाले.
- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.
हेही वाचा-

