अमेरिका-इराण युद्धाचा फटका पुण्याच्या विद्यार्थ्यांना, दुबईत इंदिरा विद्यापीठाचे 80 विद्यार्थी अडकले
इंदिरा विद्यापीठाचे 84 विद्यार्थी सध्या दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये सुरुवातीला चिंतेचं वातावरण पसरलं होतं.

Published : March 1, 2026 at 1:33 PM IST
पिंपरी-चिंचवड (पुणे) : सध्या इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाच भडका उडाला आहे. आखाती देशाना त्याची झळ पोहोचत आहे. त्यामुळे अनेक जण दुबई, बहरीन, दोहा या ठिकाणी अडकले आहेत. या युद्धामुळे जगभरातील अनेक विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे. दुबईत अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले जवळपास 80 विद्यार्थी दुबईत अडकून पडले आहेत.
खरं तर, शहरातील इंदिरा विद्यापीठाचे 84 विद्यार्थी सध्या दुबई इथं ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी गेले असून तिथं अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये सुरुवातीला चिंतेचं वातावरण पसरलं होतं. मात्र, सर्व विद्यार्थी सुखरूप असून विद्यापीठ प्रशासन त्यांच्याशी सातत्यानं संपर्कात असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जनार्दन पवार यांनी दिली आहे.
एकूण 84 विद्यार्थ्यांचा समावेश : डॉ. पवार यांनी सांगितलं की, ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी 42 मुलं आणि 42 मुली अशा एकूण 84 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठाचा स्टाफही दुबईत आहे. सध्या सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्याशी थेट संवाद सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांशीही विद्यापीठ प्रशासनाचा सातत्यानं संपर्क ठेवून आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं विद्यापीठाकडून आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यात येत आहेत. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला असून विद्यापीठाचे अधिकृत निवेदन संबंधित विभागापर्यंत पोहोचविण्यात आलं आहे. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.
परिस्थितीवर बारकाईनं लक्ष : दुबईमधील भारतीय दुतावास यांच्याशीही सातत्यानं संपर्क सुरू असून तेथील अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक ती मदत आणि समन्वय साधला जात आहे. विद्यार्थ्यांच्या परतीसंदर्भात आणि त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचंही डॉ. पवार यांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर पालकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विद्यापीठ प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आता सर्वांचं लक्ष विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीकडं लागलं आहे. विद्यापीठ प्रशासन, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास यांच्या समन्वयातून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

