वडगाव मावळ उपजिल्हा रुग्णालयात अग्निसुरक्षा 'ओक्के'; पण ICU आणि SNCU चं काय?
अमरावती येथील रुग्णालयात गॅस सिलेंडरच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील वडगाव उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत अग्निसुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

Published : August 25, 2026 at 2:12 PM IST
मावळ (पुणे) : अमरावती येथील रुग्णालयात गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः नवजात बालकांसाठीच्या उपचार सुविधा, अतिदक्षता विभाग आणि रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे, याबाबत नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील वडगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील सद्यस्थिती समोर आलीय.
वडगावच्या उपजिल्हा रुग्णालयात अग्निसुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहित काळे यांनी दिली आहे. रुग्णालयातील प्रत्येक कक्षात 'स्मोक डिटेक्टर' बसवण्यात आले आहेत. धूर निघाल्यास त्याची तातडीने माहिती मिळावी, यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर आग लागल्यास ती सुरुवातीच्या टप्प्यातच नियंत्रणात आणण्यासाठी ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स आणि फायर एक्स्टिंग्विशरची सुविधाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेचे वेळोवेळी ऑडिट केलं जातं. त्यामुळे यंत्रणा कार्यरत आहे की नाही किंवा त्यामध्ये काही त्रुटी आहेत का, याची नियमित तपासणी होत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. आग लागल्यास रुग्ण, डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करता याव्यात, यादृष्टीनं आवश्यक पूर्वतयारी करण्यात आलीय. आग विझवण्यासाठी पाण्याची उपलब्धता असणं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. यासाठी वडगाव उपजिल्हा रुग्णालयात सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध आहे. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणेला तातडीनं प्रतिसाद देणं शक्य होणार असून रुग्णालय प्रशासन यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, वडगावच्या उपजिल्हा रुग्णालयाची वैद्यकीय क्षमता वाढवण्यात आलीय. सध्या येथे 50 बेडचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून, सोबतीला नव्यानं 20 बेडचे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयाची एकूण क्षमता 70 बेडपर्यंत पोहोचली असून, मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. रुग्णालयात प्रसूती सेवा, प्रसूतीविषयक उपचार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत उपचार पुरवले जात आहेत. याशिवाय सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये गायनॅकॉलॉजी आणि जनरल सर्जरीच्या शस्त्रक्रियाही सुरू झाल्या आहेत. परिणामी, विविध उपचाऱ्यांसाठी मावळमधील नागरिकांना पुणे किंवा इतर मोठ्या शहरांमधील रुग्णालयांकडे धाव घेण्याची गरज काही प्रमाणात कमी झालीय.

मात्र, रुग्णालयात सुविधा वाढत असल्या तरी काही महत्त्वाच्या सेवांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. अतिगंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेली आयसीयू (ICU) म्हणजेच 'अतिदक्षता विभागा'ची सुविधा सध्या रुग्णालयात उपलब्ध नाही. एखाद्या रुग्णाची प्रकृती अचानक खालावल्यास त्याला तातडीनं उच्चस्तरीय उपचारांची गरज भासते. अशा वेळी आयसीयू अभावी रुग्णाला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवावं लागतं. यासोबतच नवजात बालकांसाठी अत्यंत आवश्यक असलेली एसएनसीयू (SNCU) अर्थात 'विशेष नवजात शिशु काळजी कक्ष' सुविधाही अद्याप कार्यान्वित झालेली नाही. अमरावतीतील दुर्घटनेनंतर नवजात बालकांचं उपचार आणि त्यांची सुरक्षा हा प्रश्न अधिक संवेदनशील बनला आहे. त्यामुळे मावळच्या उपजिल्हा रुग्णालयात ही एसएनसीयू सुविधा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होतेय.

रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, आयसीयू (ICU) आणि एसएनसीयू (SNCU) या दोन्ही सुविधांना तत्त्वतः मान्यता मिळाली असून त्यासंदर्भातील कामं प्रगतीपथावर आहेत. या सुविधा लवकरच पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहित काळे यांनी दिलीय. त्यामुळे एकीकडे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि पाण्याचा मोठा राखीव साठा उपलब्ध असला, तरी दुसरीकडे 'आयसीयू' आणि नवजात बालकांसाठीच्या 'एसएनसीयू' सुविधेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर, या दोन्ही महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याकडे आता संपूर्ण मावळकरांचं लक्ष लागलंय.

अमरावतीसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी केवळ अग्निसुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवणंच नव्हे, तर रुग्णालयातील सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा तातडीनं कार्यान्वित करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मावळच्या नागरिकांसाठी ICU आणि SNCU सुविधा लवकर सुरू झाल्यास गंभीर रुग्ण तसेच नवजात बालकांना वेळेत आणि स्थानिक पातळीवर उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
हेही वाचा -
- अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू, आतापर्यंत कुठे कुठे घडल्या आगीच्या घटना; जाणून घ्या घटनाक्रम
- अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची चौकशी; आठ दिवसात अहवाल द्या - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
- अमरावती रुग्णालय आग प्रकरण: 'आरोग्यमंत्री नेमकं काय करत आहेत', अंबादास दानवेंचा सरकारला सवाल

