पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर रक्षकच बनले भक्षक; लोणावळ्यात पर्यटकांना ड्रग्जच्या नावाखाली मागितली खंडणी; पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 आरोपी अटकेत
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांना अडवून त्यांच्याकडं 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली.

Published : July 8, 2026 at 7:39 PM IST
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून अनेक पर्यटक विविध पर्यटनस्थळांकडे फिरण्यासाठी जात आहेत. अशातच लोणावळ्याकडं निघालेल्या एका पर्यटक कुटुंबाला रस्त्यात अडवून गाडीत ड्रग्ज असल्याचा बनाव करत 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस कर्मचारी आणि ट्रॅफिक वॉर्डन्सला तत्काळ अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी अशी माहिती दिली.
पाच आरोपींना अटक : या प्रकरणात कामशेत पोलिसांनी तत्परता दाखवत पाच आरोपींना अटक केली. पीडित पर्यटकाने अत्यंत हुशारीने आपल्या 'स्मार्ट वॉच'वरून पाठवलेल्या आणीबाणीच्या संदेशामुळं रक्षकच भक्षक बनलेल्या लोकांचा कट समोर आला आहे.
कशी घडली घटना? : पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं की, 6 जुलै रोजी एक कुटुंब लोणावळ्याकडे जात होते. मावळ तालुक्यातील ताजे गावाजवळ त्यांच्या कारला मागून आलेल्या एका वाहनानं अडवलं. त्या वाहनातून ट्रॅफिक पोलिसांच्या गणवेशातील सहाजण खाली उतरले आणि त्यांनी कार आणि प्रवाशांची झडती घेतली. झडतीदरम्यान सिगारेटचे एक पाकीट सापडले. आरोपींनी त्या पाकिटाचा मोबाईलवर फोटो काढून ते बेकायदेशीर अंमली पदार्थ (ड्रग्ज) असल्याचा दावा केला. त्यानंतर पर्यटकांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्याची, वाहन जप्त करण्याची आणि कोर्टातून कठोर शिक्षेची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली. आरोपींनी पर्यटकांसोबत दोन जणांना बसवून त्यांच्या डेबिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीने आपल्या स्मार्ट वॉचवरून मित्राला गुपचूप एसओएस संदेश पाठवला. मित्राने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. याची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून कारने पसार झाले.
कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार : या प्रकारानंतर पीडित पर्यटकांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात सहा आरोपींपैकी तीनजण पोलीस कर्मचारी, तर उर्वरित ट्रॅफिक वॉर्डन्स असल्याचं निष्पन्न झालं. यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा -
- मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने डेहराडूनमधील व्यावसायिकाचे केले अपहरण आणि 25 लाखांची केली मागणी
- पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी कारवाई; मंतरवाडी गोळीबार अन् 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी बिश्नोई गँगचा हस्तक अटकेत
- नागपुरात 'गे डेटिंग ॲप'द्वारे अपहरण आणि खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 5 जणांना अटक

