चक्क प्रतिस्पर्ध्याचा खाऊन टाकला एबी फॉर्म; शिवसेना उमेदवारावर गुन्हा दाखल
पुण्यात महापालिका निवडणुकीतील उमेदवारानं चक्क प्रतिस्पर्ध्याचा अर्ज खाऊन टाकला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published : January 1, 2026 at 7:32 AM IST
|Updated : January 1, 2026 at 7:44 AM IST
पुणे: महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट मिळविण्यापासून ते नामनिर्देशन अर्ज भरेपर्यंत अनेक इच्छुक उमेदवारांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यात उमेदवाराचा अर्ज वैध ठरणं हा महत्त्वाचा टप्पा असताना पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला.
पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी असताना मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षातील उमेदवारांनी ३० डिसेंबरला अर्ज भरले. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (अ) मध्ये उमेदवारीवरून झालेल्या वादातून चक्क एका उमेदवारानं प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म खाल्ल्याची घटना घडली आहे. हा प्रकार अर्ज भरणे असताना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
लोकसेवकाच्या कामकाजात अडथळा आणल्यानं गुन्हा दाखल- याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी २ ते अडीच वाजण्याच्या सुमारास धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथे अर्ज भरणं प्रक्रिया सुरू होती. प्रभाग क्रमांक ३६ (अ) प्रभागात शिवसेना पक्षाकडून चुकून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म हिसकावून घेतला. त्यांनी हा फॉर्म फाडून गिळून टाकल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान शासकीय कामकाज करत असलेल्या लोकसेवकाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तर कार्यकर्त्यांमधून संतापाची भावना व्यक्त झाली होती. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. त्यानंतर सगळा गोंधळ थांबला.
मी कुठेही एबी फॉर्म खाल्लेला नाही. आमच्या पक्षाचे जे सचिव आहे, त्यांच्याशी मी संपर्क केला की, माझ्या प्रभागात एबी फॉर्म दिला आहे का? त्यांनी सांगितलं की कुठेही एबी फॉर्म दिलेला नाही.मी क्षेत्रीय कार्यालय येथे गेलो असता तिथं अधिकाऱ्यांशी बोललो. तेव्हा त्यांनी चुकीची माहिती दिली. मग, आम्हाला चुकीची माहिती दिल्यानंतर काही गोंधळ झाला. त्यात चुकीच्या पद्धतीनं अर्ज फाटला गेला. जो काही गुन्हा दाखल झाला आहे, त्याबाबत मी माहिती घेत आहे- शिवसेनेचे उमेदवार, उद्धव कांबळे
काय आहे 'ए' फॉर्मचे महत्त्व?- प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला जातो. तोच अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाकडून ग्राह्य धरला जातो. हा अर्ज मिळवण्यासाठी अनेक उमेदवार पक्षाकडं मोठी मोर्चेबांधणी आणि शक्तीप्रदर्शन करतात. पहिला 'ए' अर्जात एखाद्या राजकीय पक्षातर्फे अधिकृत उमेदवाराचं नाव, राष्ट्रीयत्व, जात, त्याचं आणि कुटुंबीयांचं उत्पन्न, उमेदवार विरोधात दाखल गुन्हे, खटले यांचा तपशील नमूद केलेला असतो. या 'ए' अर्जावर पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी आवश्यक असते.
काय आहे 'बी' फॉर्मचे महत्त्व?'बी' अर्जामध्ये अधिकृत उमेदवाराची माहिती, पक्षाची माहिती, तो राष्ट्रीय आहे का स्थानिक? याबाबतचा तपशीलासह पक्ष चिन्हाचा उल्लेख असतो. त्याचबरोबर अधिकृत उमेदवाराची माहितीसह अन्य पर्यायी उमेदवाराची माहिती त्यात नमूद केलेली असते. निवडणूक लढवताना पहिल्या अधिकृत उमेदवाराची अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर, 'बी' अर्जावर दिलेल्या दुसरा उमेदवार अधिकृत म्हणून नोंदवण्याकरिता अर्जात माहिती नमूद केलेली असते. या अर्जावरही पक्षाचा शिक्का, अध्यक्ष किंवा सचिवांची स्वाक्षरी असते.
हेही वाचा-

