भीमथडी जत्रेला पुणेकरांचा तुफान प्रतिसाद, 12 राज्यांतील ग्रामीण खाद्यपदार्थांची मेजवाणी; दीड लाखांच्या पैठणीचंही खास आकर्षण
यंदाच्या भीमथडी जत्रेत 12 राज्यातील महिला बचत गट सहभागी झाले आहेत. बचत गटातील महिलांनी बनवलेले खाद्य पदार्थ यंदाच्या जत्रेचं मुख्य आकर्षक ठरलं आहे.

Published : December 24, 2025 at 10:46 AM IST
पुणे : अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या 19व्या भीमथडी जत्रेला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. मोठ्या संख्येनं पुणेकर भीमथडी जत्रेला भेट देत आहेत. यंदाच्या या जत्रेत 300 स्टॉल्स लावण्यात असून, ज्यामध्ये देशभरातील विविध राज्यांची दालनं थाटली आहे. यंदा दीड लाख रुपयांची पैठणी साडी जत्रेतील मुख्य आकर्षण ठरत आहे.
ग्रामीण खाद्यपदार्थांची मेजवाणी : यंदाच्या भीमथडी जत्रेत ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांनी बनवलेले विविध पदार्थ खरेदी करताना पुणेकर दिसत होते. यामध्ये उन्हाळी पदार्थ, आले पावडर, विविध मसाले, गावरान तूप, विविध प्रकारचं लोणचं आणि त्या त्या राज्यातील वैशिष्ट्य असलेल्या वस्तू समाविष्ट आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. भीमथडी उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळालं असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
दीड लाखांची पैठणी : यंदा भीमथडी जत्रेतील एक प्रमुख आकर्षण म्हणजे तब्बल दीड लाख रुपये किमतीची पैठणी साडी. ही साडी पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. भीमथडी जत्रेत देशातील 12 राज्यांतील आणि 26 पेक्षा जास्त जिल्ह्यांतील महिला बचतगट सहभागी झाले आहेत. नाशिकच्या येवला येथील साई कला पैठणी या स्टॉलवर ही खास पैठणी ठेवली आहे. इथं 12 हजारांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या पैठणी उपलब्ध आहेत.

तीन महिने पैठणीवर काम : गेली 15 वर्षे या व्यवसायात असलेल्या अशोक राऊत यांनी पैठणी बद्दल सांगितलं की, ही ओरिजनल पैठणी पूर्णपणे हँडमेड आहे आणि त्यात प्युअर रेशीम तसेच प्युअर जरीचा वापर केला जातो. पारंपरिक पद्धतीनं विणलेली पैठणी पूर्णपणे ट्रॅडिशनल असून तिचं सौंदर्य वर्षानुवर्षे टिकून राहत.
एका कारागिराच्या माध्यमातून तब्बल 3 महिने या साड्यांवर काम केलं जातं. इथे मुनिया, सिंगल मुनिया, ट्रिपल मुनिया, मोर-पोपट डिझाइनच्या बॉर्डर, हाफ डिझाईन आणि ऑल वर्क पैठणी उपलब्ध आहेत. याआधी आम्ही 8 लाख रुपयांपर्यंतची सर्वात महाग साडी पूर्ण डिझाईन करून विकली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

देशभरातील 26 जिल्ह्यातील महिला बचत गट जत्रेत सहभागी : भीमथडी जत्रेचे आयोजक सुनंदाताई पवार म्हणाल्या की, "यंदाची 19 वी भीमथडी जत्रा असून पुणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदा 26 जिल्ह्यातील महिला बचतगट सहभागी झाले असून 70 टक्के स्टॉल्स हे नवीन आहेत. याव्यतिरिक्त, मीलेटचे देखील विविध स्टॉल इथं लावण्यात आले आहेत. एकूण 300 दालनं आहेत, ज्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराची विविधता पाहायला मिळणार आहे."
हेही वाचा

