ETV Bharat / state

'औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी'-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी केले राष्ट्रीय आरोग्य मेळावाचे उद्घाटन केलं. त्यानंतर मेळाव्यातील भव्य आरोग्य प्रदर्शनीची त्यांनी पाहणी केली.

National Arogya Fair 2026 in shegaon
राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात राष्ट्रपतींची प्रदर्शनाला भेट (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 7:03 PM IST

|

Updated : February 25, 2026 at 7:25 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा- शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ चा भव्य शुभारंभ झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (२५ फेब्रुवारी २०२६) हा चार दिवसीय (२५ ते २८ फेब्रुवारी) राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन झाले. हा मेळावा केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमानं विसावा भक्तनिवास संकुल (श्री संत गजानन महाराज संस्थान परिसर) येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) पद्धतींचा प्रसार आणि लोकांमध्ये आरोग्य जागृती वाढवणं हे मुख्य उद्दिष्ट आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटनप्रसंगी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, "आयुर्वेद आणि योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ आणि सुखी भविष्याची ग्वाही देते. मन आणि शरीराचे संतुलन साधून संतुलित जीवनशैली जगण्याचा मंत्र यातून मिळतो. “आरोग्यं परमं सुखम्” ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर हे सर्व कर्तव्ये पूर्ण करण्याचे साधन असल्यानं देशाला सशक्त करण्यासाठी नागरिकांचं आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. यासाठी आयुष पद्धतींची भूमिका महत्त्वाची आहे".

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Source- ETV Bharat Reporter)

औषधी वनस्पतींचे संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. ती एक लोकचळवळ होणं गरजेचं आहे. औषधी वनस्पतींची लागवड केल्यानं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, मातीचे आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. हे क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. औषधी वनस्पतींच्या क्षेत्रविस्तारासाठी अधिक प्रयत्न व्हावेत-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भारतीय आहारपद्धतीत औषधी वनस्पतींचा पूर्वापार वापर असल्याचं सांगितलं. पारंपरिक ज्ञानावर आधारित जीवनशैली आजार टाळण्यास मदत करते. परंतु आधुनिक आहारातील अनावश्यक पदार्थांमुळे आजार वाढले आहेत. आयुष पद्धतींचा प्रसार अधिक व्यापक व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की," निरामय जीवनशैली, वेलनेस आणि समग्र स्वास्थ सुरक्षा ही आयुषची आधारशिला आहे. जग 'वेलनेस'कडे वळले असून, भारताच्या प्राचीन आयुष पद्धतींमुळे आपला देश अग्रेसर ठरेल. औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल. महाराष्ट्रात स्वतंत्र आयुष मंत्रालयाची मागणी आणि विदर्भातील गरजूंना लाभ मिळावा यासाठी हा मेळावा शेगावात आयोजित केला".

मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • देशातील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य आरोग्य तपासणी आणि आयुष पद्धतीने उपचार.
  • आयुष औषध उत्पादक कंपन्या, सरकारी संस्था, संशोधन केंद्र आणि महाविद्यालयांच्या स्टॉल्सद्वारे माहितीपूर्ण प्रदर्शन.
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (नागार्जुन वनौषधी उद्यान) यांच्या सौजन्याने दुर्मिळ वनौषधी प्रदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा.
  • विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिकांसाठी आयुष चिकित्सेवर व्याख्याने.

नियोजित कार्यक्रम:

  • २६ फेब्रुवारी: दुपारी १२ वाजता 'घरचा वैद्य - आजीबाईंचा बटवा' घरगुती आयुर्वेदिक प्रथमोपचार प्रशिक्षण; दुपारी ३ वाजता शेतकऱ्यांसाठी वनौषधी लागवड, प्रक्रिया व विपणन कार्यशाळा.
  • २७ फेब्रुवारी: सकाळी १० ते ४ वाजता वयोश्री आणि ADIP तपासणी व साहित्य वाटप शिबिर (दिव्यांगांसाठी); सकाळी ११ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन व्याख्यान.
  • २८ फेब्रुवारी: सकाळी १० ते ३ वाजता मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी शिबिर.

यावेळी आयुर्वेद क्षेत्रातील ज्येष्ठ वैद्यांचा गौरव करण्यात आला. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समधील प्रमाणपत्र राष्ट्रपतींना सन्मानपूर्वक देण्यात आले. हा मेळावा आयुष पद्धतींच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शेगावसारख्या पवित्र स्थळी हा कार्यक्रम आयोजित झाल्यानं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

  • आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्राचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, अ. भा. आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष प्रो. राकेश शर्मा, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र त्रिगुणा आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
Last Updated : February 25, 2026 at 7:25 PM IST