ETV Bharat / state

ठाणे महापालिका निवडणुकीत शंभरच्यावर कोट्यधीश उमेदवार रिंगणात; उमेदवारांमध्ये परिषा सरनाईक सर्वाधिक श्रीमंत

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रांनुसार 115 उमेदवार कोट्यधीश असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Parisha Sarnaik
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 7, 2026 at 3:29 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : राज्यात पालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. अशावेळी सर्वच उमेदवारांना आपली संपत्ती निवडणूक आयोगाकडे जाहीर करावी लागते. याच उमेदवारांनी जाहीर केलेल्या शपथपत्रानुसार ठाण्यातील सर्वाधिक मालमत्ता असलेल्या महिलेचा मान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांना मिळाला आहे.

परिषा सरनाईक यांची 381 कोटीची मालमत्ता : राज्यात नवीन नियमानुसार महिलांना राजकारणात आणि निवडणुकीत आरक्षण मिळाल्यानंतर महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका परिषा सरनाईक या देखील उमेदवार आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 381 कोटीची आहे. त्यात सोने, चांदी, वाहन, जमीन आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे.

ठाण्यात करोडपती उमेदवार किती? : ठाण्यातील अशाप्रकारे करोडपती असलेल्या उमेदवारांचा आकडा मोठा आहे. काही जुन्या नगरसेवकांच्या मालमत्ता अवघ्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्याचं देखील जाहीर करण्यात आलेल्या मालमत्तेवरून दिसून आलं आहे. सरनाईक कुटुंबीयांची रिअल इस्टेट कंपनी आहे आणि या कंपनीची सुरूवात 1990 साली सुरू झाली. त्याच माध्यमातून परिषा सरनाईक यांच्या मालमत्तेत मागील दहा वर्षात दहापट वाढ झाली आहे. यावर्षी त्यांनी जाहीर केलेली एकूण मालमत्ता 381 कोटी रुपयांची आहे. त्यांच्यासोबत प्रमिला केनी 61 कोटी, कविता पाटील 55 कोटी, जयश्री फाटक 65 कोटी, नम्रता पमनानी 15 कोटी, मनाली पाटील 61 कोटी, उषा भोईर 29 कोटी, सपना भोईर 14 कोटी 68 लाख,अर्चना मनेरा 11 कोटी 34 लाख या कोट्यधीश महिलांचा समावेश आहे.



महिला उमेदवार ठरवणार सत्ता कोणाची? : ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षणामुळं 131 जागांपैकी अर्ध्या जागांवर आरक्षण आहे. मात्र, या निवडणुकीतही उभे राहिलेल्या एकूण उमेदवारांमध्ये 295 उमेदवार या महिला आहेत. त्यामुळं यावेळी महिला राज पालिकेत सत्ता बसवणार असं चित्र दिसणार आहे.



सर्वात गरीब उमेदवार मुंब्रात : एकीकडं शंभर कोटींच्यावर मालमत्ता नावावर असलेल्या उमेदवारांमध्ये गरीब उमेदवार देखील आहेत. मुंब्रा येथील राष्ट्रीवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार मोहम्मद जैद अतिक खान यांचा देखील समावेश आहे, त्यांचं वार्षिक उत्पन्न 20 हजार 502 रुपये असल्याचं निवडणूक आयोगाकडं दिलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे.


115 उमेदवार कोट्यधीश : ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये यंदा जवळपास 115 उमेदवार हे करोडपती आहेत. त्यात सर्वाधिक उमेदवार हे शिवसेनेचे (शिंदे) आहेत. त्यासोबत भाजपा पक्षातील उमेदवार कोट्यधीक्ष आहेत. मग काही अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार हे कोट्याधीश असल्याचं शपथपत्रात जाहीर केलं आहे.

हेही वाचा -

  1. "महाराष्ट्रात गुंडाराज, कायदा-सुव्यवस्था बिघडली; भाजपासोबत युती नाही", हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य सरकारवर टीका
  2. BMC ची सत्ता कोणाच्या हाती जाणार? मुंबईतील विविध भागांमध्ये काय परिस्थिती, कोणाचं पारडं जड? थोडक्यात जाणून घ्या
  3. कोणी कितीही शिव्या दिल्या तरी परिणाम होत नाही, आता ‘विष पिण्याची सवय झाली; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना टोला