ETV Bharat / state

पारंपरिक फुगडीच्या तालावर रंगला राजकीय एकोपा; फडणवीस, शिंदे, थोरातांनी धरला फुगडीचा फेर

अहिल्यानगरमध्ये श्री गंगागिरी महाराजांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात फडणवीस, शिंदे, थोरातांसह नेत्यांनी राजकीय मतभेद विसरून फुगडी खेळत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

पारंपरिक फुगडी
पारंपरिक फुगडी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 8:52 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : राहाता तालुक्यातील धनगरवाडी-दिघी येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सांगता सोहळ्याला धार्मिक आणि सामाजिक महत्त्वाबरोबरच राजकीय एकोप्याची अनोखी किनार लाभली. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे राजकीय नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत वारकरी परंपरेतील फुगडीचा आनंद घेतला.


मान्यवरांनी धरला पारंपरिक फुगडीचा फेर : सांगता सोहळ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांनी पारंपरिक फुगडीच्या तालावर धरलेला फेर. एरवी राजकीय व्यासपीठावर परस्परांवर टीका करणारे नेते एकाच तालावर फुगडी खेळताना पाहून उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या अनोख्या प्रसंगाचे स्वागत केले.

पारंपरिक फुगडीच्या तालावर रंगला राजकीय एकोपा (ETV Bharat Reporter)


अनेक आमदार आणि मान्यवर उपस्थित : या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कोपरगावचे भाजपा आमदार विवेक कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, वैजापूरचे आमदार बोरणारे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह अनेक आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.


विखे पाटील आणि मुख्यमंत्री यांची एकत्र फुगडी : कीर्तन सुरू असताना महंत रामगिरी महाराज यांनी व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थित भाविकांना फुगडी खेळण्याचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैजापूरचे आमदार बोरणारे यांची फुगडी रंगली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार विवेक कोल्हे यांनीही फुगडी खेळली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र फुगडी खेळत भक्तिमय वातावरणात आणखी रंग भरला.



उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण : या सोहळ्यात भाजपाचे आमदार विवेक कोल्हे यांनी पुढाकार घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फुगडी लावून दिली. दोन वेगवेगळ्या राजकीय विचारसरणींचे नेते एकत्र फुगडी खेळताना पाहून उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर महंत रामगिरी महाराज यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं रिंगण करण्यात आलं. राधा-कृष्णा, विठ्ठल-रुक्मिणीच्या गजरात आणि भजनाच्या तालावर सर्वच नेत्यांनी फेर धरला. यावेळी उपस्थित भाविकांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला.



सामाजिक एकोप्याचा संदेश : महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात राजकीय कटुता आणि मतभेद बाजूला ठेवून बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संस्कृतीचा वारसा जपला. भक्ती, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा प्रसंग उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकाच व्यासपीठावर आलेले विविध पक्षांचे नेते आणि पारंपरिक फुगडीच्या माध्यमातून व्यक्त झालेला हा स्नेहभाव महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील एकतेचा संदेश अधोरेखित करणारा ठरला.

हेही वाचा -

  1. महायुतीत समन्वयाचा 'फॉर्म्युला' ठरला! निधीवाटप कसं होणार? आगामी निवडणुकांचं गणित काय? सगळंच फायनल
  2. कर्जमाफीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात; 'नियमित कर्जदारांना 50 हजारांची मदत देणार'- मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
  3. राजकीय पक्षांना 'जेन झी'चं महत्त्व पटलं, राहुल गांधी यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात तरुणाईसोबत साधणार संवाद