कराडमधून मोबाईल चोरी, राजस्थानच्या टोळीतील ठगांना कर्नाटकात ठोकल्या बेड्या; तमिळ चित्रपटासारखी मोडस ऑपरेंडी
मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा १२ दिवसांत पर्दाफाश करत राजस्थानच्या टोळीतील दोन चोरट्यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांना कर्नाटकमधून अटक करण्यात आली.

Published : September 3, 2026 at 7:27 AM IST
|Updated : September 3, 2026 at 8:34 AM IST
सातारा : कराड शहरातील मोबाईल शोरूममधून 30 लाखांचे मोबाईल लंपास करून पळून गेलेल्या टोळीतील दोन चोरट्यांना कर्नाटकातील वस्कोटी (जि. बंगळुरू) इथून अटक करण्यात आली. अब्दुलहाय बशीर अहमद (रा. बावला, ता. तौरु, जि. नूह मेवात, हरियाणा आणि अलाऊद्यीन जहरुद्यीन (रा. नेहलाहंडा, ता. जेवर, जि. गौतमबुध्द नगर, उत्तर प्रदेश), अशी आरोपींची नावं आहेत. उर्वरित दोघांच्या तपासासाठी सातारा पोलिसांचं पथक राजस्थान, हरियाणात तळ ठोकून आहे.

सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यातूनच एका आंतरराज्य टोळीचे धागेदोरे हाती लागले. दोन-तीन राज्यात तळ ठोकून संशयितांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लोकांचा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरील विश्वास दृढ करणारी ही कामगिरी आहे. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक

तमिळ चित्रपटाच्या कथानकासारखी मोडस ऑपरेंडी : तमिळ चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा पद्धतीनं गुन्हा करण्याची पद्धत पाहून पोलीस चक्रावून गेले आहेत. तामिळनाडूमध्ये १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला घडलेल्या संघटित दरोड्यांच्या गुन्ह्यांवर आधारित 'थीरन' नावाचा हिंदी डब चित्रपट चांगलाच गाजला होता. राजस्थानमधील 'बावरिया' नावाची एका भटक्या गुन्हेगारांची टोळी गुन्हा करून तत्काळ वेगवेगळ्या राज्यांमध्ये पळून जायची. तामिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक एस. आर. जांगिड यांच्या पथकानं प्रत्यक्ष उत्तर भारतात जाऊन त्या टोळीचा खात्मा केला होता. कराडमधील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या टोळीची तीच मोडस् ऑपरेंडी समोर आली आहे.

30 लाख रुपये किंमतीचे मोबाईल लंपास : कराड शहरातील एस. एस. कम्युनिकेशन नावाच्या मोबाईल शोरूममध्ये 21 ऑगस्टच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास जबरी चोरी करून 30 लाख रुपये किंमतीचे मोबाईल लंपास करण्यात आले. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्याकडं या गुन्ह्याचा तपास होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता चोरट्यांनी चोरी करून पळून जाण्यासाठी स्विफ्ट गाडीचा वापर केल्याचं आढळलं.
आरोपी हरियाणा, राजस्थानमधील कुख्यात गुन्हेगार : स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं शामगाव घाट ते अहिल्यानगरपर्यंत सुमारे 250 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून स्विफ्ट कार बद्दल माहिती मिळाली. संशयितांच्या मोबाईलचे सीडीआर आणि एसडीआरचं तांत्रिक विश्लेषण केलं असता आरोपी हे हरियाणा, राजस्थान येथील असून ते रेकॉर्डवरचे कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. अथक तपास करून पोलिसांनी 12 दिवसात गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावला.
टोलनाके चुकवून आरोपींचा प्रवास : चोरी करून पळून जाताना पोलिसांना धागेदोरे मिळू नयेत, म्हणून टोलनाके चुकवून आरोपींनी प्रवास केल्याची बाब तपासात समोर आली आहे. अटक केलेले दोन आरोपी आणि त्यांचे साथीदार हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथून ट्रकमध्ये माल भरुन हरियाणा, राजस्थानला जातात. त्यांच्या साथीदारांनी रेकी करुन हरियाणा, राजस्थानमधील साथीदारांना बोलावून कराडमध्ये चोरी केल्याचं निष्पन्न झालं. कराडमध्ये चोरी करून मुद्देमाल ट्रकमध्ये भरून आरोपी हरियाणाला गेले. तिथून दुसरा माल भरुन दोघंजण 27 ऑगस्टला पुन्हा आंध्र प्रदेश मार्गे कर्नाटकला आले. त्याच ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयानं 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित दोघांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक हरियाणा, राजस्थानला गेलं आहे.
हेही वाचा :

