ETV Bharat / state

पुण्यात विषारी दारूकांड: 17 जणांच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई, 645 लिटर दारू जप्त!

पुण्यात विषारी दारूमुळं 17 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण अतिदक्षता विभागात आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत 645 लिटर विषारी दारू जप्त केली.

PUNE POISONOUS LIQUOR TRAGEDY
राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2026 at 5:38 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्यानं 17 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणातील प्रकृती गंभीर असलेल्या पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा शोध करण्यासाठी तपासाची चक्रे फिरवत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करून एकूण 645 लिटर विषारी दारू जप्त केली आहे. या कारवाईबद्दल राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळं अनर्थ टळला : पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी इथं विषारी दारू पिल्यानं अनेकांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत हडपसरमधून 70 लिटर, दापोडीमधून 155 लिटर आणि गोखलेनगरमधून 420 लीटर असं एकूण 645 लिटर विषारी दारू जप्त केली. या कारवाईमुळं मोठा अनर्थ टळला.

माध्यमांशी बोलताना राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे (ETV Bharat Reporter)

विषारी दारूचा साठा केला जप्त : "दापोडी, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ दापोडी पोलीस स्टेशनला गेलो आणि याबाबत माहिती घेतली. तसंच फुगेवाडी येथील घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील हातभट्टी निर्मिती करणाऱ्या आणि दारूची वाहतून करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना ताब्यात घेतलं. या आरोपींनी मिथेनॉल मिश्रीत विषारी दारू बनवली होती. तिचं तीन ठिकाणी वितरण केलं होतं. तिन्ही ठिकाणी गुन्हा दाखल करून तो साठा जप्त केला," अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली.

मिथेनॉल मिसळण्याचा पहिल्यांदाच केला होता प्रयोग : "याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित केलं आहे. यात 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 जवान यांचा समावेश आहे. तसंच प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, आरोपी राधेश्याम प्रजापती हा पांढरस्थळ गावामध्ये हातभट्टी चालवायचा. तर मुख्य आरोपी योगेश वानखडे यानं विषारू दारूची वाहतूक केली. अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशानं वानखडे यानं या दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळलं. प्राथमिक चौकशीनुसार, आरोपींनी मिथेनॉल मिसळण्याचा हा प्रयोग पहिल्यांदाच केला होता. यामध्ये त्याचं प्रमाण चुकल्यानं ही दुर्दैवी दुर्घटना घडली," असं राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितलं.

50 हून अधिकांना घेतलं ताब्यात : "मुख्य आरोपी योगेश वानखडेविरुद्ध यापूर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभागानं 3 गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी विभागाकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता. जो सद्यस्थितीत प्रक्रियेत होता. दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं संपूर्ण पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त कर्मचारी बोलावून कारवाया तीव्र केल्या आहेत. आतापर्यंत 55 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे," अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. जळगाव जामोद हत्याकांडातील जिवंत मुलगी परत आली प्रकरण; वडील आणि भावाला न्यायालयाने केलं मुक्त, तपास अधिकाऱ्यांची बदली
  2. इंधन तुटवड्यामुळं नाशिकहून गोवा, हैदराबादच्या विमानसेवेला ब्रेक लागण्याची शक्यता!
  3. मेळघाटात तेंदूपत्ता हंगाम सुरू; उन्हाळ्यात आदिवासी कुटुंबांना मिळतोय आर्थिक आधार!