ETV Bharat / state

पुण्यातील भाजपा महिला उमेदवार सोशल मीडियाचा ठरली बळी, रडत रडत सांगितला घडलेला प्रकार

पुण्यातील एका भाजपाच्या महिला उमेदवारानं सोशल मीडिया ट्रोलमुळं उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

pooja more social media troll
पत्रकार परिषदेत माहिती देताना पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 1, 2026 at 7:56 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - राज्यातील महानगरपालिका निवडणुकीची रंगत हळूहळू वाढत चालली आहे. आधी महायुती, महाविकास आघाडी होणार का? यावर रोज चर्चा सुरु होत्या. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत कोण कोणासोबत आहे व कोणाला एबी फॉर्म मिळाला यावरुन रणकंदन सुरू होतं. उमेदवारी मिळालेल्यांविरोधात नाराज इच्छुक आक्रमक झाले होते. तसंच अनेकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.

सोशल मीडियामुळं उमेदवारी घेतली मागं - महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. अशातच पुण्यातील प्रभाग क्रमांक २ मधून भाजपाकडून मिळालेल्या उमेदवारीनंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याने पक्षाच्या उमेदवार पूजा मोरे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर पूजा मोरे यांनी रडत रडत त्यांना कश्या प्रकारे ट्रोल करण्यात आलं याबाबत सविस्तर माहिती दिली. पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी अर्ज माघारी घेण्याबाबत माहिती दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव (ETV Bharat Reporter)

मी शेतकरी वर्गासाठी काम केलं - "आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस होता. मागील दहा, बारा वर्षाचा संघर्ष आज मला आठवत होता. मी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका छोट्या गावातील असून, माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी लढले. मराठा आरक्षणाचं काम केलं. मी माझ्या कमी वयात शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या," असं पूजा मोरे यांनी सांगितलं.

'ते' वक्तव्य मी केलंच नाही - काम बघून भाजपानं उमेदवारी दिली - लग्नानंतर मी काश्मीर येथे फिरायला गेले होते. त्याचवेळी तिथं पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्या घटनेनंतर मी घरातून बाहेर पडले आणि आपल्या राज्यातील लोकांना एकत्रित केलं. अनेकांना धीर दिला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर मी जी काही भूमिका घेतली, ती एका तासात व्हायरल झाली. त्यानंतर ज्या लोकांवर हल्ला झाला त्या लोकांना मी भेटले. पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळी माझी भूमिका अनेकांपर्यंत पोहचली नाही. मला उमेदवारी मिळालेली यांना सहन झाली नाही. 'मुख्यमंत्री साहेब आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही' हे मुख्यमंत्री यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य मी केलं नाही. भाजपानं काम बघून मला उमेदवारी दिली. मी त्यांचे आभार मानते. मी भाजपामध्ये असल्यामुळं पुढं पक्षातच काम करत राहील. पण, ज्या पद्धतीनं मला टार्गेट करण्यात आलं, त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेतली असल्याचं यावेळी पूजा मोरे यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर केलं ट्रोल - यावेळी धनंजय जाधव म्हणाले, "सोशल मीडियाचा बळी आज माझी पत्नी ठरली. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत, ते शब्द तिच्या तोंडी टाकण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी पत्नी जे बोललीच नाही ते तिच्या तोंडी टाकण्यात आलं. तसंच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जी भूमिका माझ्या पत्नीनं मांडली तीच व्हायरल करण्यात आली. त्यानंतर तिनं जो भूमिका मांडली ती व्हायरल केली नाही. काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक एकमध्ये तयारी केली होती. आम्ही उमेदवारी मागत असताना आम्हाला प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवारी देण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला ट्रोल करण्यात आलं."

हेही वाचा -

  1. तिकीट नाकारल्यानं भाजपाच्या आमदार पुत्रास काँग्रेसमध्ये येण्याची काँग्रेस आमदाराची ऑफर, भाजपा आमदार आणि पुत्राचा पलटवार
  2. भाजपामध्ये पुन्हा राडा; नाशिक शहराध्यक्षांना कार्यालयात कोंडलं, सोनं विकून पैसा उभा केला, नाराज इच्छुक आक्रमक
  3. चक्क प्रतिस्पर्ध्याचा खाऊन टाकला एबी फॉर्म; शिवसेना उमेदवारावर गुन्हा दाखल