ETV Bharat / state

मन की बात : पंतप्रधान मोदींकडून नांदेडच्या पेठकर कुटुंबाचे कौतुक, लग्नात साडेतीन हजार ग्रामस्थांना दिले 'अपघात विमा कवच'

नांदेड जिल्ह्यातील पेठकर कुटुंबानं आपल्या घरातील विवाहसोहळ्याच्या निमित्ताने 3,500 ग्रामस्थांचा अपघात विमा उतरवून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे.

PM Modi Praises Nanded Bahadurpura's Pethkar Family
पंतप्रधान मोदींकडून नांदेडच्या पेठकर कुटुंबाचे कौतुक (ETV Bharat/ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 28, 2026 at 4:09 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाचा आज रविवारी (28 जून) 135 वा भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान युवकांना प्रेरणादायी संदेश देतात आणि समाजविकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या देश-विदेशातील विविध घटनांवर चर्चा करतात. अशातच आज पंतप्रधानांनी नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबाच्या अनोख्या सामाजिक उपक्रमाचं विशेष कौतुक केलं. वाढदिवस, विवाहसोहळे आणि इतर कौटुंबिक कार्यक्रम हे केवळ उत्सव न राहता समाजहिताच्या उपक्रमांशी जोडले जावेत, असा संदेश देताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादूरपुरा येथील पेठकर कुटुंबाचा उल्लेख केला.

लग्न समारंभ म्हटला की आनंद, उत्साह आणि जल्लोष डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र कंधार तालुक्यातील बहादूरपुरा येथील पेठकर कुटुंबानं आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवत एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

3500 ग्रामस्थांचा काढला अपघाती विमा (ETV Bharat Reporter)

गावकऱ्यांना एक लाखांचा अपघात विमा : वर सिद्धेश्वर पेठकर आणि वधू मंजुषा यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त पेठकर कुटुंबानं बहादूरपुरा गावातील सुमारे 3,500 नागरिकांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या अभिनव उपक्रमामुळे हजारो ग्रामस्थांना आर्थिक सुरक्षेचं कवच मिळालं असून त्याची दखल थेट पंतप्रधानांनी घेतल्यानं नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पेठकर कुटुंबाचा प्रेरणादायी संदेश : बहादूरपुरा गावातील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतात काम करताना जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा इतर अपघातांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, अशा दुर्दैवी प्रसंगी संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा या उद्देशानं हा उपक्रम राबविण्यात आला आहे. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगाला सामाजिक बांधिलकीची जोड देत पेठकर कुटुंबानं समाजासाठी काहीतरी वेगळे आणि प्रेरणादायी करण्याचा संदेश दिला असून, त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

हा विमा सापदंश, वीज पडणे, जंगली किंवा पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे अपघात, रस्ते अपघात, तसेच घरगुती अपघातांसह कोणत्याही अपघाती मृत्यूच्या घटनांसाठी लागू असून, संबंधित कुटुंबाला एक लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे.

सिद्धेश्वर पेटकर काय म्हणाले? : याबाबत सिद्धेश्वर पेटकर म्हणाले, "आमच्या गावातील बहुतांश लोक शेतकरी आणि मजूर आहेत. शेतात काम करताना साप चावणं, प्राण्यांचे हल्ले किंवा इतर अपघात वारंवार घडतात. गावकऱ्यांचं हे कष्ट पाहून माझ्या मोठ्या भावाला त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. त्याच विचारातून आम्ही संपूर्ण गावाचा अपघात विमा उतरवण्याचा निर्णय घेतला."

ते पुढे म्हणाले, "यापूर्वीही आम्ही 'हेल्मेट आणि विमा' अभियान राबवून एका दिवसात 900 नागरिकांचा विमा उतरवला होता. माझ्या स्वतःच्या लग्नात शक्य तितक्या पाहुण्यांना हेल्मेट भेट देऊन सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला होता. आता माझ्या धाकट्या भावाच्या लग्नानिमित्त संपूर्ण गावालाच ही छोटी भेट देण्याचा निर्णय आमच्या संपूर्ण कुटुंबानं घेतला."

'समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण' : वधू मंजुषा यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितलं, "माझ्या पतीच्या मोठ्या भावाच्या प्रेरणेनं आणि संपूर्ण कुटुंबाच्या इच्छेनं आमच्या लग्नाच्या निमित्ताने 3,500 गावकऱ्यांना अपघात विमा देण्यात आला आहे. या उपक्रमाचा भाग होता आल्याचा मला अभिमान आहे. सर्वांच्या आशिर्वादाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत." लग्नासारख्या आनंदाच्या क्षणाला सामाजिक जबाबदारीची जोड देत पेटकर परिवारानं समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या या उपक्रमाचं परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - एका लग्नाची अनोखी गोष्ट; 3500 ग्रामस्थांचा काढला अपघाती विमा