ETV Bharat / state

मॉडिफाईड सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट्सवर पोलिसांचा रोडरोलर; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 569 मॉडिफाईड सायलेन्सर आणि 2,566 नियमबाह्य नंबर प्लेट्स जप्त करून रोडरोलरखाली नष्ट केल्या आहेत.

Pimpri-Chinchwad Police
सायलेन्सर मॉडिफाय करणाऱ्यांवर कारवाई (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 29, 2026 at 2:46 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करत ध्वनीप्रदूषण निर्माण करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांसह नियमबाह्य आणि फॅन्सी नंबर प्लेट (Fancy Number Plate) वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागानं धडक कारवाई केली. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी तब्बल 569 मॉडिफाईड सायलेन्सर आणि 2 हजार 566 अवैध नंबर प्लेट्स जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या या सायलेन्सर आणि नंबर प्लेट्सवर पोलिसांच्या उपस्थितीत थेट रोडरोलर फिरवून त्या नष्ट करण्यात आल्या.

पोलिसांकडं तक्रारी प्राप्त : शहरातील काही दुचाकीस्वारांकडून वाहनांच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर बसवले जातात. या वाहनांमुळं रस्त्यावर मोठा कर्णकर्कश आवाज निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा वाहनांचा आवाज परिसरातील नागरिकांच्या शांततेचा भंग करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडं प्राप्त होत होत्या.

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई (ETV Bharat Reporter)

सायलेन्सर रोडरोलरखाली चिरडून नष्ट : याशिवाय वाहनांवर आकर्षक किंवा फॅन्सी पद्धतीच्या, नियमबाह्य आकाराच्या आणि स्पष्टपणे वाचता न येणाऱ्या नंबर प्लेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवरही वाहतूक विभागानं कारवाई केली. नियमबाह्य नंबर प्लेटमुळं वाहनांची ओळख पटवण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळं अशा नंबर प्लेट्सविरोधातही पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या 569 मॉडिफाईड सायलेन्सर आणि 2,566 नंबर प्लेट्सचा साठा रोडरोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडिओ आणि छायाचित्रेही समोर आली असून, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना हा स्पष्ट इशारा मानला जात आहे.

नियमबाह्य नंबर प्लेट वापरणाऱ्यावर होणार कारवाई : दरम्यान, वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या तसेच नियमबाह्य नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं वाहनचालकांनी आपल्या वाहनांमध्ये कोणतेही नियमबाह्य बदल करू नयेत, अधिकृत नंबर प्लेटचा वापर करावा आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा -

  1. Allegation of Hindu Janajagruti Samiti : 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'कडून धार्मिक पक्षपात ! - हिंदू जनजागृती समितीचा आरोप
  2. मुंबईत पहिल्यांदाच ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात बाप्पाचे विसर्जन; 53 ते 100.7 डेसीबलपर्यंत आवाजाची नोंद
  3. मुंबईत यंदाच्या दिवाळीत ध्वनी प्रदूषणाचा स्तर घटला