इंद्रायणी स्वच्छतेसाठी महापौर थेट नदी पात्रात; प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
सात मावळे संवर्धन संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचाही सक्रिय सहभाग होता.

Published : February 23, 2026 at 2:21 PM IST
आळंदी : इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाचे महापौर रवि लांडगे यांनी स्वतः नदीपात्रात उतरून स्वच्छता करत प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला. सात मावळे संवर्धन संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचाही सक्रिय सहभाग होता.
महापौरांनी व्यक्त केली चिंता : या स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, प्लास्टिक, सांडपाणी आणि रासायनिक द्रव्यांचे अवशेष दिसून आले. महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी करताना नदीच्या पाण्यात मिसळणाऱ्या घातक घटकांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तसंच इंद्रायणी नदी ही केवळ जलस्रोत नसून आळंदीकरांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते. मात्र, वाढते औद्योगिक सांडपाणी आणि अनियंत्रित कचरा टाकण्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आल्याचं चित्र या पाहणीतून स्पष्ट झालं.
कठोर कारवाईचा इशारा : स्वच्छता करताना महापौरांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्या आणि संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देणार असल्याचं जाहीर केलं. "नदी प्रदूषण सहन केलं जाणार नाही. दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई होईल," असा इशाराही महापौर रवि लांडगे यांनी दिला. तसंच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही औद्योगिक प्रकल्पांमुळं नदीचे पावित्र्य धोक्यात येत असल्याचं प्राथमिक निरीक्षणात दिसून आल्याचंही महापौर रवि लांडगे यांनी नमूद केलं.
मोहिमेत नागरिकांचा मोठा सहभाग : या मोहिमेत सात मावळे संवर्धन संस्थेचे कार्यकर्ते, आळंदी नगरपालिकेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांनीही नदी स्वच्छतेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज व्यक्त केली. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी नदी शुद्धीकरणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचं सांगितलं. दरम्यान, इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी केवळ एकदिवसीय उपक्रम न राबवता दीर्घकालीन उपाययोजना, नियमित तपासणी आणि जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळं नदी प्रदूषणावर लगाम बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा :

