ETV Bharat / state

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ‘घड्याळ’ परत; पिंपरीत उमेदवारीला नाट्यमय वळण

छाननीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री भोंडवे यांचा ए बी फॉर्म गहाळ झाल्यानं त्यांना अपक्ष ठरवण्यात आलं. मात्र, उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांना राष्ट्रवादीचं 'घड्याळ' चिन्ह परत मिळालं.

NCP Candidate Jayashree Bhondve
उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 5:34 PM IST

|

Updated : January 5, 2026 at 8:23 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांची छाननी आणि चिन्ह वाटप प्रक्रियेत एक महत्त्वाचा निर्णय समोर आलाय. अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरवण्यात आलेल्या उमेदवाराला, प्रत्यक्ष चिन्ह वाटपाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह देण्यात आलं. त्यामुळं नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात हे नेमकं कसं घडलं? असा प्रश्न उपस्थित झालाय.

काय आहे प्रकरण? : ही संपूर्ण बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) अधिकृत उमेदवार जयश्री भोंडवे यांच्याशी संबंधित आहे. जयश्री भोंडवे या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार असतानाही, अर्ज छाननीदरम्यान त्यांचा एबी फॉर्म गहाळ असल्याचं कारण पुढे करण्यात आलं. एबी फॉर्म सादर न झाल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अर्ज छाननीच्या टप्प्यावर अपक्ष उमेदवार ठरवलं होतं. त्यामुळं अर्ज छाननीच्या अंतिम यादीत त्यांचं नाव अपक्ष उमेदवार म्हणून समाविष्ट करण्यात आल्याची महिती मोरेश्वर भोंडवे यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना मोरेश्वर भोंडवे (ETV Bharat Reporter)


न्यायालयालय सुनावणी काय? : या निर्णयाविरोधात जयश्री भोंडवे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ तसंच इतर तांत्रिक आणि कागदपत्री पुरावे सादर केले. हे सर्व पुरावे पाहता, एबी फॉर्म वेळेत सादर करण्यात आल्याचं प्राथमिक स्वरूपात स्पष्ट होत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं. त्यामुळं न्यायालयानं निवडणूक आयोगाला या प्रकरणातील सर्व पुराव्यांची स्वतंत्र आणि तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तत्काळ सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान जयश्री भोंडवे यांनी ए बी फॉर्म वेळेत सादर केल्याचं पुराव्यांसह स्पष्ट झालं. सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी एबी फॉर्म ग्राह्य धरत जयश्री भोंडवे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी म्हणून मान्य केली. अशी महिती मोरेश्वर भोंडवे यांनी दिली.


निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचं महत्त्व : परिणामी, जरी अर्ज छाननीच्या अंतिम यादीत त्या अपक्ष उमेदवार म्हणून नमूद झाल्या असल्या, तरी चिन्ह वाटपाच्या यादीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ हे अधिकृत चिन्ह देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळं पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात चर्चेला वेग आला असून, निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.


हेही वाचा -

  1. अमोल बालवडकरवर झालेल्या अन्यायाचा बदला घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुणेकरांना आवाहन
  2. अमरावतीत भाजपाला मिळणार बहुमत ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
  3. कोणता झेंडा घेऊ हाती? विविध पक्षांच्या झेंडे, शाल, खरेदीला गर्दी
Last Updated : January 5, 2026 at 8:23 PM IST