मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळल्यासंदर्भात हायकोर्टात याचिका, लवकरच सुनावणी अपेक्षित
मुंबईत सुरू असलेल्या सर्व मेट्रो मार्गिकांचं सुरक्षा ऑडिट करून त्याचा अहवाल कोर्टापुढे सादर करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आलीय.

Published : March 3, 2026 at 3:55 PM IST
मुंबई : मुलुंडजवळ मेट्रो 4 चा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. या घटनेचा संदर्भ देत मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिकांचे सुरक्षा ॲाडिट करण्याची मागणी करणारी जनहित याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आलीय. मात्र वेळेअभावी यावर सुनावणी होऊ शकली नाही, ही सुनावणी आता पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
काय आहे याचिका?- वकील रुजू ठक्कर यांनी ही जनहित याचिका सादर केलीय. 14 फेब्रुवारी रोजी अचानक मुलुंड येथील मेट्रो 4 मार्गिकेचा स्लॅब कोसळून खालून जाणाऱ्या एका रिक्षा आणि कारवर पडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काही जण जखमी झाले. या घटनेमुळे मुंबईभर पसरलेल्या मेट्रो मार्गिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तेव्हा सर्व मेट्रो मार्गिकांचं सुरक्षा ॲाडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं एमएमआरडीएला द्यावेत, अशी मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आलीय. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होणार आहे.
याचिकेतील प्रमुख मागण्या काय?
- 14 फेब्रुवारीला झालेल्या अपघाताचा चौकशी अहवाल एमएमआरडीएनं हायकोर्टात सादर करावा.
- या अपघातासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत का टाकलं नाही? याचं उत्तर एमएमआरडीएनं द्यावं.
- या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडिताच्या कुटुंबाला व जखमींना नेमकी किती नुकसानभरपाई दिली?, याची माहिती प्रशासनानं सादर करावी.
- मुलुंड येथील मेट्रोचे काम तातडीनं थांबवून येथील सुरक्षा ऑडिट सुरू करत त्याचा अहवाल कोर्टापुढे सादर करावा.
पीडित कुटुंबीय भरपाईवर असमाधानी - 14 फेब्रुवारी रोजी मुलुंडजवळ काम सुरू असलेल्या मेट्रो 4 मार्गिकेच्या बांधकामातील काही भाग कोसळल्यानं एका रिक्षा आणि चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला होता. यात रामधन यादव यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. यादव यांच्या कुटुंबीयांना एमएमआरडीएकडून 45 लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आलीय. यापैकी 5 लाख रुपये रोख देण्यात आले, तर प्रत्येकी 20 लाखांचे दोन धनादेश देण्यात आलेत. राज्य शासनाकडून जाहीर झालेली रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. तसेच नुकसानभरपाईची रक्कम अपुरी असून, किमान 2 कोटी द्यावेत, अशी मागणी नातेवाईकांनी केलीय. ही रक्कम त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला होता, मात्र मृतदेह खराब होऊ लागल्यानं अखेर नातेवाईकांनी तो ताब्यात घेतला.
आजवर झालेली कारवाई - या घटनेनंतर संबंधित प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला तात्काळ निलंबित केलंय. तर या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. पोलिसांकडून अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात असून, बांधकाम प्रक्रियेत निष्काळजीपणा का झाला का?, सुरक्षा नियमांचे उल्लंघन का झालं?, याचा गोष्टींचा तपास सुरू आहे.
हेही वाचाः

