ETV Bharat / state

टेन्शन वाढलं! इंधन टंचाईमुळं मुंबईतील पेट्रोल पंप बंद, सर्वसामान्यांचे हाल

महाराष्ट्राचं काळीज असलेल्या मुंबईलाही इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं नागरिक चिंतेत असल्याचं दिसत आहे.

mumbai petrol diesel shortage
मुंबईतील बंद असलेला पेट्रोल पंप (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2026 at 8:32 PM IST

|

Updated : May 25, 2026 at 9:22 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - एका बाजूला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची पेट्रोल- डिझेल टंचाई नाही असं राज्य सरकार ठणकावून सांगत असलं तरीदेखील महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागानंतर आता मुंबईत देखील पेट्रोल टंचाई पाहायला मिळत आहे. सायन येथील पेट्रोल पंप सोमवारी संपूर्ण दिवस पेट्रोल, डिझेल नसल्यामुळं बंद होता. यामुळं नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागलं. यामुळं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात देखील पेट्रोल टंचाईची भीषण समस्या समोर आली आहे.

मुंबईत इंधन टंचाई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या असल्याचंही पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर शेतात शेतकामासाठी देखील पेट्रोल मिळत नसल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. मात्र, मुंबई ही राजधानी असल्यामुळं अपवाद मानले जात होती. मुंबई आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोल उपलब्ध असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आज सायन येथील महत्त्वाच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळं सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झाले.

पेट्रोल पंपाबाहेरुन प्रतिनिधींनी घेतलेला आढावा (ETV Bharat Reporter)

दिवसभर पेट्रोल पंप बंद - याविषयी बोलताना या पेट्रोल पंपचे मॅनेजर यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की, आमच्या पंपासमोर असलेला पेट्रोल पंप गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळं आमच्या पेट्रोल पंपावर नागरिक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल खरेदीसाठी येत आहेत. मात्र, आम्हाला लागणारा पेट्रोलचा साठा आणि उपलब्ध होणारा पेट्रोलचा साठा यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. पेट्रोलचा साठा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, तो उपलब्ध होत नसल्यामुळे आम्हाला दिवसभर पेट्रोल पंप बंद ठेवावा लागला. रविवारी दिलेल्या पेट्रोलची ऑर्डर सोमवारी संध्याकाळी आली. यामुळे पेट्रोल पंपामधला उपलब्ध पेट्रोलचा साठा संपला. त्यामुळं आम्हाला पेट्रोल पंप बंद ठेवावा लागला.

पेट्रोल मिळत नाही - याविषयी बोलताना पेट्रोल पंपावर उभे असलेल्या संदीप मिश्रा यांनी सांगितलं की, पेट्रोल भरण्यासाठी एका तासापासून उभा आहे. मात्र, पेट्रोल मिळत नाही. जर मला पेट्रोल भरायचं असेल तर मला इथून दोन किलोमीटर लांब गाडी घेऊन जावं लागेल. त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पेट्रोल उपलब्ध होत नसल्यामुळे आमचे हाल होत आहेत.

सरकारचे म्हणणे काय? - राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. मात्र, काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले.

अतिरिक्त साठेबाजी रोखावी - काही ठिकाणी किरकोळ घटनांच्या आधारे इंधन टंचाईच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आणि तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खरेदीवर लक्ष ठेवून अतिरिक्त साठेबाजी रोखावी, असे निर्देशही मंत्री भुजबळ यांनी दिले.

हेही वाचा -

  1. इंधनाच्या दरात विक्रमी चौथी दरवाढ : जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
  2. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती; कृत्रिम टंचाईमुळे नागरिकांची वाढली चिंता
  3. इंधन दरवाढीचा थेट बाजारपेठेवर परिणाम! भाजीपाला, दूध, ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणखी महागण्याची शक्यता
Last Updated : May 25, 2026 at 9:22 PM IST