दोन दिवसांच्या मुसळधार पावसानं पर्लकोटा नदीला पूर; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पर्लकोटा नदीला मोठा पूर आला आहे.

Published : August 24, 2026 at 8:38 PM IST
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका अतिदुर्गम भामरागड तालुक्याला बसला आहे. मुसळधार पावसामुळं पर्लकोटा नदीला पूर आला आहे. नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडसह नदीपलीकडील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळं नागरिकांच्या दळणवळणासह अत्यावश्यक सेवांवरही परिणाम झाला आहे.
पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहत आहे : भामरागड तालुक्यात काल 61 मिलिमीटर, तर भामरागड मंडळात 73 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यातच पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं नदीवरील पूल पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडच्या पलीकडील अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी असलेला 100पेक्षा अधिक गावांना संपर्क खंडित झाला आहे. या गावांतील नागरिकांना बाजारपेठ, आरोग्य सेवा, शासकीय कार्यालये तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी भामरागड येथे येणं अडचणीचे झालं आहे. दरवर्षी पावसाळ्यात या परिसराला पुराचा फटका बसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा : दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदी-नाले व पुलांवरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असं आवाहन केलं आहे. प्रशासनाकडून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
भामरागडला दुसऱ्यांदा पुर परिस्थिती : भामरागड तालुक्यात 30 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळं आलेल्या महापुरानं शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक साहित्य पाण्यात वाहून गेल्यानं अनेक कुटुंबांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. पुन्हा दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं आज सकाळपासून भामरागडचे जवळून वाहणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुल पाण्याखाली गेल्यानं दुसऱ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे.
हेही वाचा -

