देवीच्या कपारीतून अखंड जलधारा; चिखलदऱ्यात निसर्ग श्रद्धेसह भौगोलिक कारणांचा अद्भुत संगम
चिखलदरा येथील देवीच्या कपारीतून वाहणारी अखंड जलधारा हे निसर्ग, श्रद्धा आणि भौगोलिक रचना यांचा एक अप्रतिम संगम आहे.

Published : September 2, 2026 at 6:35 PM IST
|Updated : September 2, 2026 at 9:01 PM IST
अमरावती : विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गानं अनेक गुड आणि मनमोहन टाकणारी ठिकाणं निर्माण केली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे देवी पॉईंट आहे. खोल दरीच्या कडेला, काळ्या कातळाच्या विशाल कपारीत विराजमान असलेली देवी आणि त्या कपारीतून वर्षभर झिरपत राहणारी जलधारा हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे.
सलग कोसळणाऱ्या जलधारा : पावसाळा असो, हिवाळा असो अथवा कडक उन्हाळा, पहाडाच्या अंतर्भागातून पाण्याचे थेंब सतत बाहेर पडताना दिसतात. श्रद्धेच्या दृष्टीनं हे पाणी तीर्थ मानलं जातं, तर भौगोलिकदृष्ट्या ही जलधारा डोंगरांच्या अंतर्गत जलसंचारणाची एक विलक्षण नैसर्गिक प्रक्रिया आहे. एकूणच देवीच्या कपारीमध्ये सलग कोसळणाऱ्या या जलधारा संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
कपारीत देवी, समोर अथांग दरी : देवी पॉईंटवरील ही कपार आकारानं खोल आणि रुंद असून तिच्या अंतर्भागात देवीचं स्थान आहे. मेळघाटातील आदिवासी समाजासाठी हे श्रद्धेचं आणि आस्थेचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. आदिवासींसह गवळी समाज आणि परिसरातील इतर भाविकही येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. अनेक कुटुंबांसाठी ही देवी कुलदैवत असल्याची श्रद्धा आहे. चैत्र महिन्यात तसेच अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवात मेळघाटातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. पूजा अर्चा, नवस फेडणंं आणि देवीचं दर्शन घेण्याची परंपरा या काळात पाहायला मिळते अशी माहिती, या ठिकाणी असणारे पुजारी मुकुंद सालफळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

चिखलदराचा महाभारताशी संबंध : चिखलदराच्या नावाशीही महाभारतकालीन कथानक जोडला गेलं आहे. या परिसराला विराट राजाची नगरी मानलं जात असल्याची स्थानिक आख्यायिका आहे. विराट राजाचा सेनापती कीचक यावरून परिसराला कीचक दरा असं नाव पडलं. कालांतराने कीचकदरा या शब्दाचा अपभ्रमश होऊन चिखलदरा हे नाव रूढ झालं अशी माहिती मुकुंद सालफळे यांनी दिली.

थेंब, थेंब झिरपते जलधारा म्हणून पाणी तीर्थ : देवीच्या कपारीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे येथे वर्षभर दिसणारं पाणी आहे. डोंगराच्या कातळातून ठिबकणारं पाणी कपारीत जमा होतं. पुढे कुंडातून दरीच्या दिशेनं वाहत. भाविक हे पाणी पवित्र मानतात. अनेकजण ते तीर्थ म्हणून ग्रहण करतात, तर काही भाविक बाटल्यांमध्ये भरून घरीही घेऊन जातात. हे पाणी जंगलातील विविध वनस्पती आणि जडीबुटींच्या परिसरातून झिरपत खाली येत असल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे. अनेक जण यात औषधी गुणधर्म असल्याचं मानतात अशी माहिती देखील मुकुंद सालफळे यांनी दिली.

काळ्या कातळाची रचना उलगडते पाण्याचं रहस्य : चिखलदराच्या डोंगररांगांमध्ये आढळणारा बेसाल्ट हा ज्वालामुखीचा खडक या संपूर्ण नैसर्गिक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. डेक्कन ट्रॅप प्रदेशातील बेसॉल्टचे थर प्राचीन ज्वालामुखीच्या लावारसाच्या थंड होण्यामुळे तयार झाले आहेत. त्यामुळं या खडकांमध्ये एकसारखी रचना नसून अनेक ठिकाणी वेगवेगळे थर, सांधे, भेगा आणि झीज झालेल्या पातळ्या आढळतात. बेसॉलच्या काही भागांमध्ये सूक्ष्मच्छिद्रे असली तरी पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून नेण्याचं काम मुख्यता खडकातील भेगा आणि सांधे करतात. पावसाचं पाणी या नैसर्गिक मार्गाने हळूहळू डोंगराच्या आत झिरपतं. एखाद्या कमी पारगम्य थरामुळे त्याचा प्रवाह अडला की पाणी त्या थरावर साठू लागतं. पुढे डोंगराच्या उतारावर किंवा खोल कपारीच्या ठिकाणी हा जलवाहक थर जमिनीच्या भूपृष्ठालात छेदतो. त्यानंतर साठलेलं पाणी बाहेर झिरपू लागतं. देवीच्या कपारीतील वर्षभर सुरू असलेली जलधाराही याच नैसर्गिक प्रक्रियेचे एक सुंदर उदाहरण मानता येतं. पावसाळ्यात भूजल साठा वाढतो. त्यातून पाणी दीर्घकाळ हळूहळू बाहेर पडत राहिल्यामुळं उन्हाळ्यातही कपारीत पाण्याचे थेंब दिसतात अशी माहिती भूगोल विषयाचे अभ्यासक प्रा.डॉ. सावन देशमुख यांनी दिली.

बेसॉल्ट खडकाचं आणखी एक वैशिष्ट्य : बेसॉल्ट हा कठीण आणि टिकाऊ खडक असल्यानं त्यातून तयार झालेल्या डोंगररांगा, कडे, कपारी आणि खोल दऱ्या चिखलदऱ्यासारख्या डोंगराळ प्रदेशात ठळकपणे दिसतात. मात्र, दीर्घकाळ चालणारी पावसाची झीज, तापमानातील बदल आणि भेगांमधून होणारी पाण्याची हालचाल यामुळं या खडकांमध्ये हळूहळू झीज होते. त्यातून कपारी आणि नैसर्गिक जलमार्ग तयार होण्यास मदत होते. यामुळं देवीच्या कपारीतील पाणी हा केवळ डोंगरातून गळणारा थेंब नाही तर तो पाऊस, बेसॉल्टची रचना, खडकांतील भेगा, भूजल साठा आणि गुरुत्वाकर्षणाचा दीर्घ नैसर्गिक प्रक्रियेचा परिणाम आहे. असे देखील प्रा.डॉ. सावन देशमुख यांनी स्पष्ट केलं.
कपारीतील जलधारेतून चंद्रभागा नदीचा उगम : देवीच्या कपारीतून झिरपणारं पाणी पुढे कुंडात जमा होतं आणि तिथून दरीत कोसळत चंद्रभागा नदीच्या प्रवाहाला सुरुवात होते. चिखलदरा येथील देवी पॉइंट या ठिकाणी उगम असणारी चंद्रभागा नदी दक्षिणेकडं दर्यापूर, अंजनगाव परिसराच्या दिशेनं प्रवास करत पुढे पूर्णा नदीला मिळते. त्यामुळं चंद्रभागा ही तापी पूर्णा नदी प्रणालीशी जोडलेली नदी आहे. भुलेश्वरी नावाची नदी ही चंद्रभागा नदीची उपनदी मानली जाते. चंद्रभागेचं पाणलोट क्षेत्र सुमारे 1524 चौरस किलोमीटर आहे.
देवीच्या दर्शनासोबत निसर्गाचा व्ह्यू पॉईंट : देवीच्या कपारीसमोर उभं राहिलं की एका बाजूला काळी क्षार खोल कपार, त्यातून टपकणारं पाणी आणि दुसऱ्या बाजूला खोल दरीचं विहंगम दृश्य असा निसर्गाचा अद्भुत अविष्कार पाहायला मिळतो. कपारीच्या आसपासचा परिसरही हिरवाईनं नटलेला असल्यानं पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरतं. कपारीच्या अगदी बाजूला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहणारा धबधबाही आहे. धबधबा आणि कपारीतील जलधारा पुढे दरीत एकत्रित होत असल्यानं चंद्रभागेच्या प्रवाहाची सुरुवात या निसर्ग रम्य परिसरातून होते.
"पावसाचे पाणी सच्छिद्र असणाऱ्या खडकामध्ये झिरपतं. ते भूजलसाठा म्हणून साचलं जातं. ज्या ठिकाणी हा खडक कठीण असतो तिथं हे पाणी अडतं आणि बाजूला उताराच्या दिशेने आतून व्हायला लागतं आणि जिथे त्यांना भेगा मिळतात, अशा उताराच्या दिशेने वाहून ते पाणी बाहेर पडतं. चिखलदरा येथील देवी पॉइंट येथे देखील पावसाचं पाणी हे भूजल साठ्यामध्ये साचलेला आहे. ते त्या ठिकाणी बाहेर येतं हे महत्वाचं कारण आहे." - प्रा.डॉ.शुभांगी देशमुख, अभ्यासक भूगोल विषय
भाविकांची जलधारेवर श्रद्धा : कपारीत विराजमान असणाऱ्या देवीवर जितकी भाविकांची श्रद्धा तितकीच श्रद्धा या कपारीत कोसळणाऱ्या जलधारेवर भाविकांची श्रद्धा आहे. स्थानिक आख्यायिका, आदिवासी परंपरा, डेक्कन ट्रॅची भूगर्भीय रचना, भूजल पुनर्भरण आणि नदीच्या उगमाची संकल्पना हे सारंं एकाच ठिकाणी अनुभवता येतं. या कपारीतील जलधारेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ही जलधारा देवीच्या अंगावर अजिबात पडत नाही. मात्र, देवीच्या अगदी समोर थेंबा थेंबान झिरपणार पाणी पाहताना भाविकांना त्यात श्रद्धेचा स्पर्श जाणवतो. या कपारीत काही ठिकाणी जलधारांचा वेग अतिशय जास्त असतो. मुसळधार पावसात भिजावं त्याप्रमाणे या कपारीमध्ये अनेकदा भाविक ओले चिंब होतात. नैसर्गिकरित्या शुद्ध असणारं हे पाणी अनेकजण हर्बल वॉटर म्हणून वापरतात. त्यांना फायदाही होतो, असं मंदिरातील पुजारी मुकुंद सालफळे म्हणाले.
हेही वाचा -

