पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती चौकशीच्या फेऱ्यात, कारवाई न झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होणार आहे.

Published : May 26, 2026 at 8:24 PM IST
कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील क्षत्रिय मराठा रिसायत फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी दिला.
काय आहे नेमकं प्रकरण? - जनसामान्यांना ज्या गोष्टीची चीड असते तो भ्रष्टाचार लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचतो. पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. करवीर निवासिनी आई अंबाबाईला अर्पण होणाऱ्या साड्यांमधील कथित घोटाळा, बोगस पूरग्रस्त दाखवून केलेली फसवणूक, देवस्थान समितीच्या अखत्यारीतील जमिनीच्या 8 हजार गटांचं सर्वेक्षण करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीनं दिलेलं सात कोटींचं कथित टेंडर, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नावाखाली अनाठायी खर्च या कथित भ्रष्ट कारभारामुळं 2017 ते 2021 काळातील देवस्थान समितीचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापक चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. याबाबतची कागदपत्र राज्याच्या विधी व न्याय खात्याला दिली असून या भ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्याची माहिती कोल्हापुरातील क्षत्रिय मराठा रिसायत फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराचे आरोप - राज्यात 2014 यावर्षी भाजपा, शिवसेनेचे सरकार आल्यानंतर 2017 मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर अध्यक्ष म्हणून भाजपाचे महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसाग, सचिव विजय पवार, व्यवस्थापक धनाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, 2017 ते 2021 या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीत भ्रष्टाचाराचे पेव फुटले. संपूर्ण देशभरातून आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी देवस्थान समितीने काम करावं, अशी अपेक्षा असताना या समितीत मात्र बेकायदेशीर नोकर भरती, कोल्हापुरात आलेल्या महापुरात जनावरांचे धान्य प्रोटीन्स खरेदीत झालेला घोटाळा, बोगस पूरग्रस्त दाखवून देवस्थान समितीच्या खजिन्यातून काढलेली रक्कम यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
प्रकरणाची चौकशी होणार - याबाबतची सर्व कागदपत्रे पुराव्यांशी कोल्हापुरातील क्षत्रिय मराठा रिसायत फाउंडेशनचे प्रसाद मोहिते, सौरभ पवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर केली. जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांविरोधात दोषारोपपत्र तयार करून हा अहवाल राज्याच्या विधी व न्याय विभागाला पाठवला होता. या अहवालावरून आता तत्कालीन अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं क्षत्रिय मराठा रिसायत फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितलं.
कारवाई न झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या 2017 ते 2021 या कालावधीत अध्यक्ष म्हणून भाजपाचे माजी प्रदेश सचिव महेश जाधव यांनी काम पाहिलं, तर कोषाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर होत्या. यामुळे या भ्रष्टाचाराची विधी व न्याय खात्याकडून चौकशी होणार की नाही याबाबत कोल्हापूरकरांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं क्षत्रिय मराठा रिसायत फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी सांगितलं.

