ETV Bharat / state

MCA ला हायकोर्टाचा अंशतः दिलासा; FDA ला पुन्हा तपासणीचे आदेश; फूड वेंडिंग मशीनमधून अन्न-चहा देण्यास तात्पुरती मुभा

FDA च्या अधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट रोजी MCA शी संबंधित तीन अन्न आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.

Partial relief for MCA from Bombay High Court
MCA ला हायकोर्टाचा अंशतः दिलासा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 1:43 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बीकेसीतील एमसीए रिक्रिएशन क्लबवरील अन्न सुरक्षा आणि परवाना कारवाईप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) अंशतः दिलासा दिला आहे. सध्या काही क्रिकेट सामने सुरू असल्यानं फूड वेंडिंग मशीनच्या माध्यमातून अन्नपदार्थ तसेच चहा-कॉफी पुरवण्यास न्यायालयानं तात्पुरती मुभा दिली आहे.

उच्च न्यायालयानं अन्न व औषध प्रशासनाला (FDA) गुरुवारी (27 ऑगस्ट ) बीकेसीतील एमसीए रिक्रिएशन क्लबची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. दुपारी 1 ते सायंकाळी 6 या वेळेत ही तपासणी करावी, असंदेखील न्यायालयानं स्पष्ट केलं.

FDA विरोधात MCA ची हायकोर्टात धाव : वास्तविक, 20 ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत अपयशी ठरल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनानं आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली कारवाई करत बीकेसीतील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिष्ठीत 'एमसीए रिक्रिएशन क्लब'चा अन्न परवाना निलंबित करत तेथील सर्व खाद्य आस्थापनांना टाळ ठोकलं. त्याविरोधात एमसीएनं हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल करत FDA ची कारवाई ही मनमानी करणारी असल्याचा आरोप केला आहे.

हायकोर्टाचा एमसीएला अंशत: दिलासा : या याचिकेवरवर आज (25 ऑगस्ट) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्यापुढे मंगळवारी तातडीची सुनावणी झाली. त्यावेळी एमसीएच्यावतीनं युक्तिवाद करताना कोर्टाला सांगण्यात आलं की एफडीएनं केलेली कारवाई ही एकतर्फी आणि मनमानी पद्धतीची आहे. आपली बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच, तपीसणीत नेमकं कोणते निकष लावण्यात आले, किती गुण मिळाले याची कोणतीही माहिती त्यांना देण्यात आलेली नाही. यावर ही माहिती कोर्टापुढेही का नाही? असा सवाल कोर्टानं विचारताच ही कारवाई मुल्यांकनाच्या नव्या पद्धतीनुसार केल्याची माहिती एफडीएच्यावतीनं देण्यात कोर्टाला देण्यात आली. मात्र, तुमची ही कार्यपद्धती योग्य नाही. सुरक्षेच्या बाबतीत तुमच्या कठोर धोरणाचं कौतुकच आहे. मात्र, समोरच्यालाही आपली बाजू मांडायची संधी मिळायला हवी असं स्पष्ट करत हायकोर्टानं एफडीएला गुरूवारी एमसीएत जाऊन पुन्हा नव्यानं तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

शनिवारी पुन्हा सुनावणी होणार : तपासणीदरम्यान सर्व काही योग्य आढळल्यास सायंकाळी 6 नंतर परवाना निलंबनाची कारवाई तत्काळ शिथिल करून बंद करण्यात आलेल्या आस्थापना सुरू करण्याची मुभा द्यावी, असे निर्देशही हायकोर्टाने FDA ला दिले आहेत. दरम्यान, एमसीएने दाखल केलेल्या याचिकेवर शनिवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

सोमवारी FDA ची मोठी कारवाई : मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित तीन अन्न आस्थापनांवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानं (FDA) सोमवारी (24 ऑगस्ट) मोठी कारवाई केली. परमीट रूम, पॅव्हिलियन आणि मेडिटेरियन या तीन अन्न आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानंतर त्यांचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले. FDAच्या या कारवाईमुळे अन्न आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

20 ऑगस्टला तपासणी, 21 ऑगस्टला परवाने निलंबित : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट 2026 रोजी या तीनही अन्न आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि उपकरणांची स्वच्छता यासंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.

सोबतच, या तपासणीत किचनमधील एका फ्रीजमध्ये बर्फ साचलेला आढळून आला. तसेच किचनच्या प्रवेशद्वाराजवळील फरशी अस्वच्छ आढळून आली. तसेच FSSAI परवाना हा प्रमुख ठिकाणी दर्शनी भागात प्रदर्शित केलेला नव्हता. यासह खाद्यतेलाचा रंग, वास आणि इतर घटकांच्या आधारे करण्यात येणारी नियमित तपासणी तिथं केली जात नसल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं. तसेच भाजीपाला आणि ठेवलोला अन्य कृषीजन्य कच्चा माल खराब अवस्थेत आढळून आला. याशिवाय तिथले कर्मचारी स्वच्छता आणि सॅनिटेशन व्यवस्थेचं पालन अपेक्षित निकषांनुसार करत नसल्याचं या पाहणीत निदर्शनास आलं. या सर्व त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत FDA ने कारवाई केली. 21 ऑगस्ट 2026 रोजी आदेश काढून परमीट रूम आणि पॅव्हिलियनचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले.