ETV Bharat / state

खिडक्या मोडल्या, पत्रे गंजले, लाईट नाही ना शौचालय! छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था

'सर्व शिक्षा अभियान' ही मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणारी योजना आहे. मात्र, शाळेत सुविधाच नसतील तर शाळेत का जायचं? असा प्रश्न पालकांना पडला आहे.

Palshi Zilla Parishad School
पळशी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 15, 2026 at 10:54 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर - राज्यभरात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. नव्या वर्षात नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. खासगी शाळांमध्ये विविध प्रकारे स्वागत कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसंच स्वागत सरकारी शाळांमध्ये करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यात जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांचा अभाव 'जैसे थे'च असल्याचा पाहायला मिळाला.

आश्वासनाच्या पलीकडं काही मिळालं नाही - अनेक ठिकाणी शाळांच्या इमारती मोडकळीस असल्याचं दिसून आलं. लाईट नाही, शौचालय नाही एक ना अनेक अडचणी असल्याचं चित्र आहे. नवीन वर्षात आता हे चित्र बदलेल, अशी आशा असताना मात्र अद्याप गरीब विद्यार्थ्यांच्या नशिबी असलेला अंधार तसाच आहे. पळशी येथील 1970 मध्ये बांधलेल्या इमारतीत शाळा भरत असून, ती इमारत पूर्णतः मोडकळीस आली आहे. त्याबाबत वारंवार तक्रारी करुनही आश्वासनाच्या पलीकडं काही मिळालं नाही. या इमारतीची न्यायाधीशांनी देखील पाहणी करून दुरुस्तीचे निर्देश देवूनही सरकारी यंत्रणा हलायला तयार नाहीत, हे विशेष.

शाळेच्या दुरवस्थेबाबत प्रतिनिधींनी घेतलेला आढावा (ETV Bharat Reporter)

शाळा आली मोडकळीस - पळशी येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था शासकीय व्यवस्थेचा आरसा दाखवणारी आहे. सदरील इमारतीतील आठ वर्गखोल्या पूर्णतः मोडकळीस आल्या आहेत. 1970 दरम्यान इमारतीचे बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी मुख्याध्यापक पंकज मंडके यांनी दिली. इमारतीचे पत्रे काही ठिकाणी गंजून मोडकळीस आले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी त्यांना छिद्रे पडली आहेत. वरच्या बाजूस असलेले कठडे तुटल्याने पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाणी पडतं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे येतात. शिवाय त्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती एक दोन वर्षांची नाही तर मागील अनेक वर्षांपासून अशीच असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बसावं लागतं. काही वर्षांपूर्वी चार खोल्या बांधण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये संगणक कक्ष, विज्ञान कक्ष तयार करण्यात आले. त्यामुळं तातडीनं नवीन वर्ग खोल्या बांधण्याची गरज असल्याची माहिती प्रभारी मुख्याध्यापक पंकज मंडके यांनी दिली.

Palshi Zilla Parishad School
पळशी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था (ETV Bharat Reporter)

पोषण आहार होत आहे खराब - जिल्हा परिषद पळशी शाळेत जवळपास 310 मुलं अध्ययनासाठी येतात. त्यांच्यासाठी शालेय पोषण आहार शासनातर्फे पाठवला जाता. मात्र, तो देखील जागेअभावी खराब होत असल्याचं मुख्याध्यापक पंकज मंडके यांनी सांगितलं. "दोन वर्गखोल्या अतिशय खराब अवस्थेत आहेत. त्यातील एका खोलीची अतिशय दुरवस्था होती. उंदरांनी पूर्ण जमीन उकरून काढली. त्याची थोडी दुरुस्ती केली. त्यामध्ये आलेला पोषण आहार ठेवला. काही दिवसांनी पुन्हा घुस आणि उंदरांनी सर्व उकरून काढले. कधी पावसाच्या पाण्याने तर कधी उंदरांमुळे गरीब मुलांच्या पोटात जे अन्न जायला पाहिजे ते वाया जात आहे. मागील चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन खराब झाली असल्याने रोज पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहेत. इमारतीचं बांधकाम चांगलं होणं गरजेचं आहे," अशी मागणी मुख्याध्यापकांनी प्रशासनाकडं केली.

न्यायाधीशांनी केली होती पाहणी - पळशी येथील या शाळेत मागील वर्षी दोन न्यायमूर्ती यांनी दौरा केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर शिक्षण अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी देखील हजर होते. त्यावेळी न्यायमूर्तींनी शाळेच्या दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या. तरी अद्याप त्यावर कुठलीही प्रक्रिया झाली नाही. मागील तीन वर्षांमध्ये शिक्षण विभागाकडे नवीन वर्गखोल्या बांधण्याची मागणी करण्यात आली. तसा प्रस्ताव शालेय समितीने मंजूर करून पाठवला. त्याबाबत अद्याप काहीच प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. पंचायत समिती सदस्या निर्मला पळसकर या प्रस्ताव मागवून वर्गखोल्या बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक पंकज मंडके यांनी दिली.

Palshi Zilla Parishad School
पळशी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था (ETV Bharat Reporter)

सर्व शाळांचा एकत्रित प्रस्ताव पाठवला - "जिल्ह्यातील दुरवस्था असलेल्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापरला जातो. सर्व नादुरुस्त शाळांची माहिती एकत्रित करून जिल्हा परिषद विशेष कार्यकारी अधिकारी यांना सादर केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल," अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली. "शाळांबाबतचा अहवाल मागवला असून, सर्व कामं करण्यासाठी नियोजन केले जाईल. मुख्याध्यापकांनी स्वतः येऊन जरी अडचणी सांगितल्या तरी त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल," अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम मिन्नू यांनी दिली.

Palshi Zilla Parishad School
पळशी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था (ETV Bharat Reporter)

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये - "राज्यभरात अनेक शाळांची अवस्था बिकट आहे. त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. गोरगरिबांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. त्यांच्या जीवाशी खेळ मांडू नये," अशी भावना शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांनी व्यक्त केली. "राज्यातील मोडकळीस आलेल्या किंवा सुविधा नसलेल्या शाळांचे ऑडिट झाले पाहिजे. त्यांच्या कामांना तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यायला हवा," असं देखील साळकर म्हणाले.

हेही वाचा - महागाईचा फटका; छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा सुरू होताच विद्यार्थी वाहतुकीच्या दरात मोठी वाढ!