पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीच्या प्रवेशाला स्थगिती; विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाचा निर्णय
पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी काशिनाथ चौधरी (Kashinath Chaudhary) यांच्या पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाने तत्काळ स्थगिती दिली.

Published : November 17, 2025 at 6:10 PM IST
मुंबई : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल 2020 रोजी झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात भारतीय जनता पार्टीने मुख्य सूत्रधार म्हणून ज्यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्या काशिनाथ चौधरी यांच्या भाजपामधील पक्षप्रवेशाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ स्थगिती दिली. विरोधकांच्या तीव्र टीकेनंतर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला.
पक्षप्रवेशाला दिली स्थगिती : काशिनाथ चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) कार्यरत होते. 16 नोव्हेंबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही तासातच राज्यभरातून टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं की, प्रकरणाची संवेदनशीलता आणि जनभावना लक्षात घेऊन काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाने तत्काळ स्थगिती दिली आहे. पालघर जिल्हाध्यक्षांना याबाबतचे लेखी पत्रही पाठवण्यात आले आहे.
भाजपाकडून सारवासारव : नवनाथ बन यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, सीबीआय आणि सीआयडीच्या तपासात चौधरी यांचं नाव कोठेही आरोपी म्हणून नाही. प्राथमिक माहिती अहवालात किंवा आरोपपत्रातही त्यांचा उल्लेख नाही. पूर्ण माहिती घेऊनच स्थानिक पातळीवर त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर झालेल्या चर्चेनंतर पक्षाने संवेदनशीलतेचा विचार करून माघार घेतली. याच पत्रकार परिषदेत बन यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, “कालपर्यंत राष्ट्रवादीत असताना चौधरी रोहित पवारांना चांगले वाटत होते. आता भाजपामध्ये आले की एका रात्रीत दोषी कसे झाले? हा दुटप्पीपणा जनता सहन करणार नाही.”
मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण : दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला होता. मी या प्रकरणाची माहिती घेतली. जे आरोप करत आहेत, ती व्यक्ती कालपर्यंत त्यांच्यासोबत होती, तेव्हापर्यंत चांगली होती. आज आमच्याकडं आली, तर वाईट झाली. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झालेली आहे आणि त्यात काय समोर आलं, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं मला स्थानिकांनी सांगितलं की, आम्ही सगळ्याची माहिती घेतल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे."
भाजपने पालघर साधू हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांच्याच पक्षप्रवेश करून घेतला आणि आज तोच पक्षप्रवेश कसा योग्य असल्याचे मुख्यमंत्री ठासून सांगत होते. आता मात्र चौफेर टीका होताच भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सदरील पक्षप्रवेश स्थगित केला.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 17, 2025
“ना नीती ना मत्ता, प्रिय फक्त सत्ता”… pic.twitter.com/YiSsibGTrf
रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर : मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "पालघर साधू हत्याकांडासंदर्भात आपली प्रतिक्रिया बघितली. दोन वर्षांपूर्वी आपण आरोप करून राळ उठवली आणि ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनाच नेहमीप्रमाणे भाजपात घेतलं. आमच्याकडं असलं की आरोप, तुमच्याकडं येताच पवित्र होतात. सलीम कुत्ता, इकबाल मिरची, आदर्श घोटाळा अशी असंख्य प्रकरणं आहेत, ज्यांचे डाग भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले आहेत. उद्या कोणताही मोठा गुन्हेगार जर भाजपात आला तर आपण त्याला देखील क्लीन चीट द्याल, यात शंका नाही . असो, आधी आरोप करायचे आणि नंतर पक्षात प्रवेश द्यायचा, आपली ही मोडस ऑपरेंडी बघता, “ना नीती ना मत्ता... प्रिय केवळ सत्ता” हेच आपल्या नव्या भाजपाचे तंत्र दिसते," असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा -
- Palghar Sadhu Murder Case : पालघर साधू हत्याकांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 'या' दिवशी सुनावणी
- Palghar Sadhu Murder Case : पालघरमधील साधू हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे; मृतकांच्या नातेवाईकांना न्यायाची अपेक्षा
- पालघर हत्याकांडाची चौकशी सीबीआयकडे देण्यासाठी आंदोलन; राम कदमांना ताब्यात घेऊन सुटका..

