"दरवाजाची बेल वाजणार नसते, पण आम्ही रोज दहा वाजता वाट पाहतो"-पहलगाम हल्ल्यात पिता गमाविलेल्या मुलीला अश्रू अनावर
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पिता गमाविलेल्या आसावरी जगदाळेंना दहा महिन्यानंतरही सरकारी नोकरी मिळाली नाही. त्याबाबत लवकर प्रक्रिया सुरू व्हावी, अशी अपेक्षा जगदाळे यांनी व्यक्त केली आहे.

Published : February 17, 2026 at 4:08 PM IST
|Updated : February 17, 2026 at 5:19 PM IST
पुणे : काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या 26 जणांमध्ये पुण्यातील जगदाळे आणि गणबोटे या परिवारातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारकडून संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेत नोकरी देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, या घटनेला 10 महिने उलटूनही सरकारी नोकरी देण्याची कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी आसावरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचं आश्वासन दिलं होतं. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दहा महिन्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पुणे मनपा आयुक्तांना दिले आहेत.

सहा ते सात महिन्यांपासून उपमुख्यमंत्र्यांशी संवाद करण्याचे प्रयत्न- पुढे आसावरी जगदाळे यांनी म्हटलं," मला नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर दहा महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष पूर्ण होईल. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं होण्याचे प्रयत्न केले होते. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करते. खरंतर हे काम होणार नाही, असे वाटल्यानं आशा सोडून दिल्या होत्या. मेधाताई यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना परिस्थिती समजल्यावर खूप वाईट वाटलं. त्यांना आमच्याबद्दल आपुलकी वाटली. सोशल मीडिया आणि माध्यमातून आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचू शकलो आहोत. आम्ही ऑगस्टनंतर सचिव आणि मंत्र्यांचे पीए यांना संपर्क केलेत. माझ्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणं महापालिका आयुक्तांनी वर्ग-२ पदासाठीचे पत्र वरिष्ठांना पाठविलं होतं".
वडील गेल्यानंतरही दहा महिन्यापांसून रोज येते आठवण- पहलगाम हल्ल्याच्या दिवशी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची आसावरी जगदाळेंना आजही आठवण आहे. त्याबाबत जगदाळे म्हणाल्या," त्या दिवशी, आम्ही तिघे एकमेकांच्या हातात हात धरून बसले होते. "मोदींना तुम्ही डोक्यावर चढवून ठेवले", असे म्हणत त्यांनी (दहशतवाद्यांनी) डोक्यात वडिलांच्या गोळ्या घातल्या होत्या. मोदींचं नाव घेतल्यानं धर्मासह देशावर हल्ला होता. यामध्ये आमचं कुटुंब पूर्ण उद्धवस्त झालं. रोज रात्री दहा वाजता वडिलांची येण्याची वेळ होती. पण, आज रात्री दहा वाजता दरवाजा वाजणार नाही, हे आम्हाला माहित असते. पण, आम्ही दहा महिने वाट पाहत आहोत. ही भावना आम्ही रोज जगत आहोत". वडिलांच्या आठवणीनं आसावरी यांना अश्रू अनावर झाले.
त्यांना सोशल मीडियात आजवर अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावर जगदाळे यांनी हा अनुभव सांगताना म्हटलं," तेव्हा हलगर्जीपणातून दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. त्या बदल्यात आर्थिक मदत आणि नोकरी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आम्ही लोभी नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूची किंमत कधीही येऊ शकत नाही. सरकार वडिलांना परत आणून देऊ शकत नाहीत. सोशल मीडियात आम्हाला ट्रोलिंग करण्यात आलं. आमच्यावर जशी वेळ आली, तशी कोणावरही वेळ येऊ नये. वाईट बोलणाऱ्यापेक्षा चांगल्या लोकही खूप आहेत. तुमच्या पाठीशी आहोत, असे अनेकांनी आजवर मेसेज केले आहेत".
हेही वाचा-

