राज्यात 5.63 लाखांहून अधिक रेबीज प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
दहा महिन्यांत राज्यात 2.80 लाख श्वानांचं निर्बीजीकरण तर 6.30 लाख श्वानांचं लसीकरण, तरीही 5 लाख श्वानदंशाच्या घटनांची नोंद, हायकोर्टाकडून गंभीर दखल.

Published : November 4, 2026 at 10:50 PM IST
मुंबई : राज्यात यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत तब्बल 2,81,943 भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात आलं असून 6,34,563 श्वानांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं बुधवारी (4 नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयात दिली. मात्र तरीही राज्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख श्वानदंशाच्या घटना घडल्याची माहिती याचिकाकर्त्यानं दिल्यामुळं अद्यापही श्वानदंशाच्या घटना कायम असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर चिंता व्यक्त केली. दरम्यान, निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी उपाययोजना केल्या जात असतानाही श्वानदंशाच्या घटना कायम असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. या घटनांमध्ये वाढ होण्यामागील कारणांचा अभ्यास करण्याची गरज असून, याचिकाकर्त्यांनी यासंदर्भातील सूचना राज्य सरकारला द्याव्यात. त्यातील योग्य सूचनांचा सरकारी योजनांमध्ये समावेश करता येईल, असं स्पष्ट करत या प्रकरणावरील सुनावणी 22 जानेवारी 2027 पर्यंत तहकूब केली.
श्वानदंशाच्या मुद्यावर राज्य सरकारची आकडेवारी : बुधवारच्या सुनावणीत राज्य सरकारच्यावतीनं वकील ओमकार चांदूरकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत यासंदर्भातील आकडेवारी साजरी केली. जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यातील महापालिकांनी 1,53,373 श्वानांचं निर्बीजीकरण केल्याची माहिती दिली. तसंच नगरपालिका आणि नगरपंचायतींनी 91,980, ग्रामीण भागात 22,495 तर पशुसंवर्धन विभागानं 14,095 श्वानांचं निर्बीजीकरण केलंय. तर याच कालावधीत लसीकरणाच्याबाबतीत महापालिकांनी 3,46,502 ग्रामीण भागात 1,50,046, नगरपालिका आणि नगरपंचायतींनी 1,01,737, तर पशुसंवर्धन विभागानं 36,278 श्वानांचं लसीकरण केलंय.
1,088 भटक्या श्वानांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात आलंय : याचबरोबर, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बसस्थानके आणि रेल्वेस्थानकांसह 8,034, संस्थात्मक परिसरांमध्ये 23,719 भटक्या श्वानांची ओळख पटवण्यात आलीय. त्यापैकी 1,088 भटक्या श्वानांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात आलंय. तसंच सार्वजनिक वाहतूक केंद्रे, उद्यानं आणि धार्मिक स्थळांसह 10,016 सार्वजनिक ठिकाणं भटक्या कुत्र्यांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलीत. याशिवाय, राज्यातील 1,974 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 736 सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे 5,63,000 हून अधिक रेबीज प्रतिबंधक लसींचा साठा असल्याचंही यावेळी राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं.
काय आहे याचिका? : मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासंदर्भातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानं साल 2025 मध्ये दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं ही सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्याकरता त्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण यांसारख्या उपाययोजना पुरेशा आहेत का?, हे तपासण्यासाठी राज्यातील भटक्या श्वानांचा सध्याच्या संख्येचा अंदाज असणं आवश्यक असल्याचं यात न्यायालयाला सहाय्य करण्याकरता नेमणूक केलेल्या (अमायकस क्युरी) ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांनी गेल्या सुनावणीत खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिलं होतं.

