91 लाख रुपयांना संत्रा बाग विक्री, दुष्काळी करंजीत प्रगत शेतीचा आदर्श
शेती जर चांगली केली तर त्यामध्ये उत्पादनही चागलं मिळतं, हे करंजीतील शेतकऱ्यानं दाखवून दिलं. त्याची संत्र्याची बाग सुमारे एक कोटी रुपयांना विकली गेलीय.

Published : January 9, 2026 at 4:02 PM IST
शिर्डी (अहिल्यानगर) - दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी परिसरात कमी पाण्यातही शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती शक्य आहे. हे प्रगतशील शेतकरी दादासाहेब उर्फ रंगनाथ अकोलकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे. अकोलकर यांनी आपली संत्रा फळबाग तब्बल 91 लाख 1 हजार रुपयांना विक्री करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील दादासाहेब अकोलकर हे अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात कार्यरत असून त्यांनी संत्रा, डाळिंब आणि कांदा ही पिकं घेतली आहेत. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या संत्रा पिकावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं. नियोजनबद्ध शेती, सेंद्रिय खतांचा वापर आणि पाण्याचं काटेकोर व्यवस्थापन यामुळे त्यांच्या संत्रा बागेचं उत्पादन लक्षणीयरित्या वाढलं आहे. अकोलकर यांच्याकडे एकूण 12 एकर शेती असून त्यामध्ये 3 एकर डाळिंब, 5 एकर कांदा आणि साडेचार एकर संत्रा फळबाग आहे. संत्रा बागेत एकूण 800 झाडं असून त्यापैकी 300 झाडं 13 वर्षांची तर 500 झाडं 9 वर्षांची आहेत. शेणखत आणि सेंद्रिय स्लरीचा वापर करून फक्त ड्रिप सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं. त्यामुळे अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळला जात असून झाडांना आवश्यक तेवढंच पाणी मिळतं, परिणामी फळधारणा चांगली होते. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं काही काळ बागेत पाणी साचलं होतं. त्यामुळे काही प्रमाणात फळ आणि पानगळ झाली. अन्यथा उत्पादन आणखी वाढलं असतं असं अकोलकर यांनी सांगितलं.

मागील काही वर्षांत ही संत्रा बाग 10 ते 21 लाख रुपयांपर्यंत विकली जात होती. मात्र यावर्षी उत्पादनात वाढ झाल्यानं आणि बाजारात चांगला भाव मिळाल्यानं विक्रमी दर मिळाला आहे. संत्र्याचा दर्जा, आकार आणि वजन उत्कृष्ट असल्यामुळं माल उठून दिसत होता. त्यामुळे व्यापारी जालिंदर वामन, गजानन गायकवाड आणि प्रदीप खांदवे यांनी ही संपूर्ण संत्रा बाग 91 लाख 1 हजार रुपयांना खरेदी केली असल्याचही दादासाहेब अकोलकर आणि आबासाहेब अकोलकर यांनी सांगितलं आहे.

करंजी, भोसे, दगडवाडी, सातवड, घाटशिरस, जोडमोहोज, लोहसर, खांडगाव, कौडगाव, जोहारवाडी, देवराई, निंबोडी, वैजुबाभळगाव, शिराळ-चिचोंडी, कोल्हार, तिसगाव आणि मिरी परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे. वेळप्रसंगी टँकरनं पाणी आणून फळबागा जगवण्याचं काम येथील जिद्दी शेतकऱ्यांनी केलं आहे. मागील वर्षी अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं फळबागा टिकवून ठेवल्या. राष्ट्रीय पातळीवर संत्रा-मोसंबीला मिळालेल्या बाजारपेठेमुळं करंजी परिसरातील संत्रा जम्मू-काश्मीर, केरळ यांसारख्या राज्यांत पोहोचत आहे. सध्या संत्र्याला 55 ते 60 रुपये प्रतिकिलो दर मिळत असून दररोज सुमारे 500 टन संत्रा करंजी परिसरातून परराज्यात पाठवला जात आहे. करंजी, देवराई, निंबोडीफाटा आणि तिसगाव परिसरात बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी गोडाऊन उभारून संत्रा-मोसंबीची प्रतवारी करून तत्काळ विक्रीसाठी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्री करण्यासाठी फायद्याचं ठरत आहे. बाग विक्रीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकरी दादासाहेब अकोलकर तसंच आबासाहेब अकोलकर या बंधूंचा फेटा बांधून सत्कार केला.

हेही वाचा...
- विदर्भातल्या शेतकऱ्यानं केली संत्री पिकात क्रांती, एआयच्या मदतीनं एका झाडाला लागतायत १५०० फळं
- काश्मीरच्या ईडलिंबूवर विदर्भातील संत्र्याचा 'डोळा'; तुम्हाला माहितीये का कसं तयार होतं संत्र्याचं रोप? वाचा स्पेशल रिपोर्ट
- ...तर विदर्भातील संत्र्यांना मिळणार 'प्रीमियम मार्केट', संत्रा उत्पादकांनी नेमकं काय करावं? वाचा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट

