ETV Bharat / state

'महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची'; मुख्यमंत्र्यांचा चिमटा, म्हणाले, 'साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण...'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी विरोधकांसह साहित्यिकांनाही चांगलेच चिमटे काढले.

DEVENDRA FADNAVIS ON MARATHI
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 5:31 PM IST

|

Updated : January 2, 2026 at 7:45 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

सातारा : महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी भाषा सक्तीची आहे. इतर कुठलीही भाषा सक्तीची नाही, तर ती भाषा पर्यायी आहे, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. साताऱ्यातील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढं म्हणाले की, "मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत कुठल्याही संस्थेत राजकीय हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला साहित्यात राजकीय हस्तक्षेप करायचा नाही. तसेच साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये."

Devendra Fadnavis On Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन (ETV Bharat Reporter)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून मुख्यमंत्र्यांनी थेट भाषा सक्तीच्या विषयाला हात घातला. ते म्हणाले की, "मराठीला केवळ अभिजात भाषा जाहीर करून थांबता येणार नाही. मराठी जी मुळातच अभिजात होती, तिला राजमान्यता देण्याचं काम झालं. या राजमान्यतेचा उपयोग करून मराठीला संपूर्ण देशात लोकमान्यता देखील मिळवून घायची आहे. भाषा सक्तीचा मुद्दा सातत्यानं येतोय. मी मुख्यमंत्री म्हणून सांगतो की, महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी सक्तीची आहे. इतर कुठलीही भाषा सक्तीची नाही. त्रिभाषा सुत्रामध्ये भारतीय भाषांमधील जी भाषा तुम्हाला शिकायची असेल ती शिका."

'महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची'; मुख्यमंत्र्यांचा चिमटा, म्हणाले, 'साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण...' (ETV Bharat Reporter)

नरेंद्र जाधव यांची समिती : "महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एक अहवाल आमच्याकडं आला. त्यात त्यांनी पहिलीपासून पर्यायी भाषा सक्तीची म्हटलं होतं. तेच आम्ही पुढं नेलं. परंतु, त्यानंतर अनेकांनी मत व्यक्त केलं की पहिलीपासून सक्ती योग्य नाही. भाषा सक्ती तर योग्यच नाही. मग ती कधीपासून शिकवायची, यासाठी नरेंद्र जाधव यांची समिती तयार केली आहे. त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. तो अहवाल महाराष्ट्रासमोर मांडू आणि योग्य निर्णय घेऊ," असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. "विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, ही वृत्ती बरोबर नाही. सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे. परंतु, मातृभाषा ही अधिक सन्मानित झाली पाहिजे, ही खऱ्या अर्थानं आमच्या सरकारची भूमिका आहे," असं त्यांनी जाहीरपणे सांगितले.

Devendra Fadnavis On Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

नवीन अध्यक्षांकडं दिला पदभार : "मावळत्या अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांकडं पदभार दिला. त्यांनी यांच्या हाती राज्य सोपवलं. त्यांनी ते स्वीकारलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. असंच जर राजकारणातही होऊ शकलं, तर किती चांगलं होईल. किमान साहित्य क्षेत्रात होतंय ते असंच होत राहावं, अशी माझी अपेक्षा आहे. संमेलनात एखादी टीका झाली आणि ती योग्य असेल तर त्यातून सुधारण्याचा मार्ग दिसतो आणि त्या मार्गानं पुढं जाण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. सर्वकाही आपल्यालाच समजतं, असं समजून मुर्खांच्या नंदनवनात वावरणारा मी नाही," असा खोचक टोला देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना लगावला.

आपल्या विचारांची संस्कृती नदीसारखी : "कोयना कृष्णेत मिळते, वारणा कृप्णेत मिळते, यमुना गंगेत मिळते आणि शेवटी एक पात्र तयार होते. त्याप्रमाणं आपल्या विचारांची संस्कृती एका नदीसारखी आहे. ज्याच्यामध्ये विविध विचारांच्या मंथनातून नदीचा असा एक प्रवाह तयार होतो, जो संस्कृती, साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो. विचारांना प्रगल्भ करतो. ती परंपरा आपल्या मराठी साहित्यानं, साहित्य संमेलनानं, मराठी भाषेनं, मराठी भाषेतील सारस्वतांनी जपली आहे," असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

आणीबाणीच्या काळातील संमेलनाची आठवण : आणीबाणीच्या काळात झालेल्या संमेलनाची आठवण ताजी करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. "50 वर्षापूर्वी आणीबाणी लागली होती. त्यावेळी याच साताऱ्यात साहित्य संमेलन झालं होतं. त्याच्या अध्यक्षा दुर्गा भागवत होत्या. त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठरावही झाला होता. साहित्याला नियमबद्ध करणं नुसतं हास्यास्पद नाही, तर धोकादायक देखील असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्याची त्यावेळी हेडलाईन झाली होती," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

संविधानाला कसलाही धक्का लागणार नाही : "आपल्या लोकशाहीत विचारांची, अभिव्यक्ती, विचारांचं स्वातंत्र्य, साहित्य, परस्पर विरोधी विचार, या सगळ्यांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जोपर्यंत आपण अबाधित ठेऊ तोपर्यंत कोणी कितीही 'संविधान खतरे है' म्हटलं तरी मजबूत असलेल्या संविधानाला कसलाही धक्का लागणार नाही. संधिानानं दिलेल्या विचारांच्या स्वातंत्र्याची कोणीही गळचेपी करू शकत नाही. ते अबाधितच राहील," असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं.

हेही वाचा :

  1. अवघी शाहूनगरीत साहित्यमय, उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन
  2. मराठी भाषा, संस्कृती, इतिहासाच्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष; साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा राज्यकर्ते, साहित्यिक आणि लेखकांना घरचा आहेर
  3. साताऱ्यातील साहित्य संमेलन 'घालमोड्या दादां'चे, अलुतेदार-बलुतेदारांनी त्यांच्या मंडपात जाऊ नये - डॉ. भारत पाटणकर
Last Updated : January 2, 2026 at 7:45 PM IST