कोयना धरणात अवघा 10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक; वीजनिर्मिती बंद
कोयना धरणाचा शिवसागर जलाशय कोरडा ठाक पडत चालला असून पाऊसकाळ लांबल्यास सिंचनासह वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.


Published : May 31, 2026 at 11:04 PM IST
सातारा : कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला सोमवारपासून (१ जून) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणात रविवारी सकाळी (31 मे) 8 वाजता 10 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. दरम्यान, पायथा वीजगृहातून 22 ऑक्टोबर 2025 पासून सुरू असलेला पुर्वेकडील विसर्ग आता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. तसेच पाणी कोटा संपल्याने वीजनिर्मिती बंद झाली आहे.

कोयना धरणाचं तांत्रिक वर्ष आज संपलंय. वीजनिर्मितीचा कोटा संपल्यामुळे पश्चिमेकडील तसेच पुर्वेकडील वीजनिर्मिती बंद झाली आहे. सध्या धरणात शिल्लक असलेलं 10 टीएमसी पाणी हे सिंचन आणि पिण्यासाठी राखीव आहे. - महेश रासनकर, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग

कोयना धरणात सध्या 10.94 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा : कोयना धरणात सध्या 10.94 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 1 जून ते 30 मे पर्यंत 67.57 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी करण्यात आला आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पूर्वेकडील सिंचनासाठी पायथा विद्युतगृहातून 33.10 टीएमसी आणि विमोचकामधून 6.91 टीएमसी, असा एकूण 40.1 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. कोयना धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पूर्वेकडील सिंचनासाठीच्या पाण्याचा विसर्ग सध्या पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

यंदा 1.70 टीएमसी पाणी कमी : कोयना धरणाचं 1 जून ते 31 मे हे तांत्रिक वर्ष असतं. कृष्णा पाणी वाटप तंटा लवादानुसार 1 जून पासून 67.5 टीएमसी एवढा पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आरक्षित होतो. उर्वरीत पाणीसाठा हा पूर्वेकडील सिंचन आणि पिण्यासाठी दिला जातो. धरण व्यवस्थापनाचं काटेकोर नियोजन हे अनेकदा यशस्वी ठरलं आहे. मागील वर्षी देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत धरणात १७ टीएमसी पाणी शिल्लक होतं. त्या तुलनेत यंदा 1.70 टीएमसी पाणी कमी आहे.

8 टीएमसीहून अधिक पाण्याचे बाष्पीभवन : यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयना धरणातील जवळपास 8 टीएमसीहून अधिक पाण्याचे बाष्पीभवन झालं आहे. कोयनेच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. तापोळा, बामणोलीतील बोटिंग बंद असल्याने पर्यटनावर बंद आहे. पाण्याखालच्या गावांचे, मंदिरांचे अवशेष उघडे पडले आहेत. अशी परिस्थिती असताना उद्यापासून (1 जून) कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षाला सुरूवात होत आहे. अल निनो वादळामुळे 10 जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा सिंचन आणि पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा :

