कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; पोत्यावरील मोदींच्या फोटोमुळं खतांचे भाव वाढले?
कांद्याला हमीभाव मिळत नसल्यामुळं बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Published : February 27, 2026 at 5:43 PM IST
|Updated : February 27, 2026 at 8:54 PM IST
बीड : जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. 16 क्विंटल काद्यांचे अवघे 1,542 रुपये हातात आल्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळं शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. एक एकर कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास 50 हजार रुपये खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यानं एका एकरमध्ये 16 क्विंटल कांदा काढला. तो कांदा विकून त्याला अवघे 1,542 रुपये मिळाले. त्यामुळं शेतकऱ्यानं केलेला खर्च कसा काढायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत शेतकरी काय म्हणतात ते आपण पाहूयात...
मी घर बांधू की सावकाराचं कर्ज फेडू? : "मी या कांद्यासाठी 45 हजार रुपयांचं कर्ज सावकाराकडून व्याजानं घेतलं आहे. कांदा काढला तर मला यातून सात हजार रुपयांचं उत्पादन आलं. आता बाकीचे पैसे मी कसे द्यायचे? हा मोठा प्रश्न माझ्यापुढं आहे. एवढंच नाही तर या कांद्याच्या जीवावर मी घराचं बांधकाम काढलं होतं. मात्र तेही आता बंद पडलं. मी आता सावकाराचे पैसे देऊ की घराचं बांधकाम करू? हा प्रश्न माझ्यापुढं उभा आहे. त्यामुळं सरकारनं काहीतरी मेहरबानी करावी आणि कांद्याचा भाव वाढावा त्याचबरोबर हमीभाव तरी कांद्याला द्यावा ही आमची मागणी आहे, अशी माहिती शेतकरी बालाजी शिंदे यांनी दिली.
मोदींच्या फोटोमुळं खताचे भाव वाढले : "आम्हाला एक एकर कांदा पिकवायला सुमारे 50 ते 60 हजार रुपये लागतात. एवढा खर्च होऊन देखील आमच्या हातात काहीही उरत नाही. आमच्या पुढं आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यावर सरकारनं काहीतरी पर्याय काढावा, नाही तर सरकारनं आम्हाला गांजा किंवा अफू लागवडीची परवानगी द्यावी. कांद्याबाबत एकही लोकप्रतिनिधी अधिवेशनात प्रश्न मांडत नाही. ज्यावेळी निवडणुका असतात, त्यावेळी मात्र नेते आमचे पाय धरतात. जे आमच्या जीवावर निवडून येतात ते आमच्याकडं लक्ष देत नाहीत, याचा आम्हाला खेद वाटतो. खताची गोणी दोन हजार रुपयाला झाली आहे. त्याच खताच्या गोणीवर मोदींचा फोटो आहे, त्या फोटोला पाहून खताचे भाव वाढलेत का? सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या कांद्याला हमीभाव द्यावा," अशी मागणी शेतकरी अशोक शिंदे यांनी केली.
आमच्या मालाला हमीभाव द्या : "मायबाप सरकार आमच्या कांद्याला भाव द्या. लाखो रुपये खर्च करून आज आमच्या हातात काहीच उरत नाही. त्यामुळं सरकार तुम्ही ज्या 'नमो शेतकरी' सारख्या योजना चालू केल्या आहेत. त्या बंद करा 'पीएम किसान' सारखी योजना तुम्ही चालू केली आहे, ती देखील बंद करा. मात्र आमच्या कांद्याला हमीभाव द्या, पाच रुपये आणि चार रुपये किलोनं कांदा विकतोय ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तीन-तीन महिने आम्ही शेतात राबतो त्याचं आमचं काही मोल आहे की नाही? शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरवण्यासाठी व्यापारी नको आम्हाला हमीभाव द्या, अशी मागणी शेतकरी वैभव शिंदे यांनी केली.
हेही वाचा :
- चार नेते दादांना त्रास देत होते; रोहित पवार यांचा निशाणा, सुनेत्रा पवार यांना बोलू दिलं जात नसल्याचा थेट आरोप, मुख्यमंत्र्यांना भेटून मांडली भूमिका
- पोलीस भरतीचं स्वप्न अधूरं; 26 वर्षीय तरुणीची सुसाईड नोट लिहून आत्महत्या
- शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; खग्रास चंद्रग्रहणानिमित्त साईबाबांचं दर्शन साडेतीन तास बंद

