ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक वसाहतीत ओलियम वायूची गळती; शाळा, उद्योग आस्थापनांतील विद्यार्थी, कामगारांना अन्यत्र हलवले

जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Oleum gas leak in Tarapur industrial estate in Palghar
तारापूर औद्योगिक वसाहतीत ओलियम वायूची गळती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 6:15 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीतील भगेरिया केमिकल्स कंपनीत सोमवारी (3 मार्च) दुपारी दोन ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ओलियम वायूची गळती सुरू झाली. त्यामुळं नागरिकांना तसंच कामगारांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तसंच डोळ्यांची जळजळ आणि घशात खवखव सुरू झाली. काहींना वातासारखे प्रकार सुरू झाले. त्यामुळं एकच घबराट निर्माण झाली असून या ओलियम वायूची परिसरात दहशत पसरली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. भगेरिया केमिकल्स कंपनीत रासायनिक पदार्थांचे उत्पादन होते. तेथून दुपारी ओलियम वायूची गळती सुरू झाली. ओलियम हा वायू हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्यापासून सल्फर डायऑक्साईड व इतर सल्फर ऑक्साईडची निर्मिती होते. या वायूमुळं डोळ्यांची चुरचूर, डोळे लाल होणे, घशात कोरडेपणा आणि खवखव अशा तक्रारी सुरू झाल्या.

तारापूर औद्योगिक वसाहतीत ओलियम वायूची गळती; शाळा, उद्योग आस्थापनांतील विद्यार्थी, कामगारांना अन्यत्र हलवले (ETV Bharat Reporter)



दीड दोन किलोमीटर परिसरात ओलियम वायूची दहशत : तारापूर औद्योगिक वसाहतीपासून दीड ते दोन किलोमीटर परिसरात या वायूचा परिणाम जाणू लागला आहे. वायू हवेच्या दिशेनं सर्वत्र पसरत आहे. त्यामुळं कॅमलिन नाका ते टाकी नाकादरम्यान उद्योग व परिसराला या वायूचा मोठा फटका बसल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखर यांनी आपत्कालीन कक्षासह महसूल, एमआयडीसी, अग्निशमन विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग आदी सर्व विभागांना सतर्क केलं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजू वसावे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या कंपनीकडे जाणारा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला असून इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Oleum gas leak in Tarapur industrial estate in Palghar
तारापूर औद्योगिक वसाहतीत ओलियम वायूची गळती (ETV Bharat Reporter)


पांढऱ्या धुक्याची चादर : एमआयडीसीच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली असून ओलियम वायूची गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ओलियम वायूचा एक टन साठा बाधित झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संपूर्ण परिसरात पांढऱ्या धुक्याची चादर पसरली असून टाकी नका परिसरातील तारापूर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून तातडीनं घरी सोडण्यात आलं तसंच इतर आस्थापनांच्या कामगारांनाही सुरक्षित तरी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Oleum gas leak in Tarapur industrial estate in Palghar
तारापूर औद्योगिक वसाहतीत ओलियम वायूची गळती (ETV Bharat Reporter)


पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या सूचना : पालघरचे पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांनी परिसरात तातडीनं धाव घेतली. या परिसरात ओलियम वायूपासून काय दक्षता घ्यावी? याचे फलक लावण्यात आले आहेत तसंच ओलियम वायू ज्या दिशेकडून येतो, त्या दिशेने प्रवास करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय या परिसरात वावरताना मुखपट्टी किंवा ओला रुमाल नाकावर बांधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वायू गळती रोखण्यासाठी युद्ध पातळीवरून प्रयत्न सुरू असले, तरी ही गळती रोखण्यात कधी यश येईल, हे सांगता येत नाही.

Oleum gas leak in Tarapur industrial estate in Palghar
तारापूर औद्योगिक वसाहतीत ओलियम वायूची गळती (ETV Bharat Reporter)


काय करा, काय करू नका? : पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांनी नागरिकांना पळापळ करू नका, घाबरू नका, असं आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्यानं शांत रहावे, शक्यतो घरात थांबावे, घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात, पंखे, वातानुकूलन यंत्रणा तात्पुरती बंद ठेवावी, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावं, लहान, मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसन विकार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. याशिवाय, कारखान्याजवळ गर्दी करू नका, गळतीच्या ठिकाणी जाण्याचा किंवा तपास करण्याचा प्रयत्न करू नये, खोटी माहिती, अफवा समाजमाध्यमांवर पसरवू नये, आपत्कालीन सेवांच्या कामात अडथळा आणू नये, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

  1. व्हीएसआरचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी उपस्थित केले प्रश्न
  2. इराण-इस्रायल संघर्ष : कोल्हापुरातील एमबीबीएसचे 6 विद्यार्थी शारजाहमध्ये अडकले
  3. विश्व मराठी संमेलन 2026 : मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो- निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई