बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात अटक आरोपींची संख्या 5 वर, आणखी दोघांना अटक होण्याची शक्यता
तो एका शाळेचा शिक्षक असल्याचीही माहिती पुढे येत आहे, तर या प्रकरणात सातवा आरोपी देखील पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र, तो अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आलीय.


Published : February 27, 2026 at 4:58 PM IST
|Updated : February 27, 2026 at 5:27 PM IST
नागपूर- बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासा होत आहेत. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 5 झालेली आहे तर आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. सहावा संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याच्याकडून तपास सुरू आहे. तो एका शाळेचा शिक्षक असल्याचीही माहिती पुढे येत आहे, तर या प्रकरणात सातवा आरोपी देखील पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र, तो अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आलीय.
18 फेब्रुवारीला पेपर फुटीचा पहिला गुन्हा दाखल- आतापर्यंत तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. तर विद्यार्थ्यांना जामीन मिळालाय. 18 फेब्रुवारीला पेपर फुटीचा पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतरही तपासात आरोपींनी 21 फेब्रुवारी रोजी झालेला गणित विषयाचा पेपर फोडल्याचं पुढे आलंय. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी याला दुजोरा दिलाय. नागपूरच्या सेंट उर्सुला हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरती 18 फेब्रुवारीला हा प्रकार उघडकीस आलाय.
मोबाईलच्या तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती उघड- एक विद्यार्थिनी वॉशरूममध्ये गेल्यानंतर बराच वेळ परत न आल्यामुळे पर्यवेक्षकांना तिच्यावर संशय आला. विद्यार्थ्यांनी झडती घेतली असता तिच्याकडून स्मार्टफोन जप्त करण्यात आला. मात्र, ज्यावेळी मोबाईल तपासला तेव्हा ‘XII’ नावाचा 21 सदस्य संख्या असलेला व्हॉट्सएप ग्रुप आढळला. ग्रुपवर सकाळी 10 वाजून 37 वाजताच रसायनशास्त्राचा पेपर उत्तरांसह पोस्ट करण्यात आला होता. 16 फेब्रुवारीला झालेला भौतिक शास्त्राचा पेपरसुद्धा फुटला असल्याचे समजले. पोलिसांनी तांत्रिक तपासात आरोपीने फॉरमॅट केलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला असता गणिताचाही पेपर फुटल्याचं स्पष्ट झालंय.
मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता- सध्या या प्रकरणत पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला होता. प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झालाय, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला, तरीही 21 फेब्रुवारीला गणिताचा पेपरसुद्धा फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळालेत. मुलीच्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याचं समोर आले होते. पाच सदस्यांचे विशेष तपास पथककडून पेपर फुटीसंदर्भात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, पेपरफुटीमागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तविली जातेय. सध्या शिक्षक निशिकांत मून, एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान, जुनेद जावेद अटकेत आहेत.
बंद लिफाफ्यात प्रश्नपत्रिका कमी कशा?- परीक्षा केंद्रांवर सीलबंद लिफाफ्यात प्रश्नपत्रिका कमी आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजी विषयांच्या प्रश्नपत्रिका 25 ऐवजी 24 प्रतीच प्राप्त झाल्याची तक्रार अनेक परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांनी केलीय. या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. परीक्षेच्या दिवशी प्रेसमधून सीलबंद पाकिटे थेट केंद्रांवर पाठवली जातात. मात्र, काही केंद्रांवर लिफाफा उघडताच एक प्रश्नपत्रिका कमी असल्याचे निदर्शनास आलंय.
हेही वाचाः

