सचिन अहिरांवर पक्षांतरबंदी लागू होणार का? ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केली कायदेशीर बाजू
सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांचा हात धरलाय. यावर कायदे अभ्यासक ॲड. असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली.

Published : June 30, 2026 at 5:27 PM IST
पुणे : राज्याच्या राजकारणात आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला. सचिन अहिर यांनी एकट्यानेच पक्षप्रवेश केल्यानं त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर कायदे अभ्यासक ॲड. असीम सरोदे यांनी आपलं मत व्यक्त करत, त्यांच्यावर तत्काळ कोणतीही अपात्रतेची कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
अपात्रतेची कारवाई करता येणार का? : आमदार सचिन अहिर यांच्यासह विधान परिषदेत ठाकरेंचे सहा आमदार असताना सचिन अहिर यांनी एकट्यानेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार का? असा प्रश्न ॲड. सरोदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, भारतीय संविधानाच्या दहाव्या परिशिष्टातील परिच्छेद 5 मधील तरतुदींनुसार काही विशिष्ट घटनात्मक पदांवरील व्यक्तींना अपात्रतेच्या कारवाईपासून विशेष कायदेशीर संरक्षण प्राप्त होतं. या पदांमध्ये लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती यांचा समावेश होतो. या संवैधानिक पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींवर ते पदावर कार्यरत असताना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करता येत नाही, असं त्यांनी सांगितलं.
कायद्याचा सखोल अभ्यास करून केलं पक्षांतर : ते पुढे म्हणाले की, सचिन अहिर यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज भरला असून सत्ताधारी पक्षाकडं बहुमत असल्यामुळं ते विधान परिषदेचे उपसभापती होणार हे निश्चित आहे. उपसभापती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी संबंधित उमेदवार हा त्या सभागृहाचा केवळ आमदार असावा ही एकच पात्रता महत्त्वाची आहे. ते कोणत्या पक्षाचे आहेत, या कायदेशीर बाबीचा निवडीशी संबंध नसतो. सचिन अहिर हे सध्या विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांचा अर्ज पूर्णपणे वैध आहे. जरी ठाकरे यांनी सचिन अहिर यांची पक्षातून हकालपट्टी केली तरी उपसभापती पदावर गेल्यानं त्यांच्यावर पक्षांतर बंदी होणार नाही. ते उपसभापती पदावर असेपर्यंत त्यांच्या आमदारकीला कोणताही धोका असणार नाही. हे अत्यंत वेगळ्या प्रकारचे आणि कायद्याचा सखोल अभ्यास करून केलेले पक्षांतर आहे. भविष्यात जर ते या पदावरून पायउतार झाले किंवा त्यांना पदावरून दूर केले गेले, तरच त्यांच्याविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई पुन्हा होऊ शकते, असं असीम सरोदेंनी सांगितलं.

