नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी घेतला नदी-नाले सफाई अभियानाचा आढावा, गाळ आणि माती वृक्षारोपणाच्या कामात वापरावी
नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील नदी आणि नाले सफाई अभियानाचा सविस्तर आढावा घेतला.

Published : May 2, 2026 at 1:30 PM IST
नागपूर : पावसाळा सुरू होण्यास एकच महिना शिल्लक आहे. त्यामुळं 'नाले सफाई अभियान' नागपूर महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आलं आहे. पावसाळ्यापूर्वी सुनियोजित पद्धतीनं नाले सफाईचं काम पूर्ण करण्याचे निर्देश संबधित विभागाला देण्यात आले आहेत. नदी, नाले सफाई अभियान अधिक प्रभावीपणे राबवून नदी, नाल्यातील गाळ, माती काढण्याची जागा निश्चित करून देण्यात यावी. तसंच नदी, नाले सफाई अभियान येत्या 15 जून पर्यंत राबवण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभागाला दिलेत. त्यांनी नाग नदी सफाईची प्रत्यक्ष पाहणी केली.
नालेसफाईसाठी बैठक : नाले सफाई अभियानासह सर्व लहान, मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामाचा आढावा आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत गांधीबाग, महाल झोन सभापती उमा देशमुख, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती सारिका, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह कार्यकारी अभियंता, दहाही झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
माती, गाळा संदर्भात योग्य नियोजन करण्यात यावे : पावसाळ्याला सुरुवात होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी असून, पावसाळ्यापूर्वी नाग नदी आणि लगतच्या नाल्याची सफाई पूर्ण करण्यात यावी, जेणेकरून सामान्य नागरिकांना पावसाळ्यात त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. नदी आणि नाल्यांच्या सफाई दरम्यान निघणाऱ्या माती आणि गाळ काढण्यासंदर्भात योग्य नियोजन करण्यात यावं. नदीच्या लगत गाळ व माती ठेवण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी. आवश्यकता असल्यास नदी सफाईसाठी अधिक जेसीबी आणि इतर मशीनचा वापर करावा असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
गरज असल्यास नवीन यंत्र घेऊ : याशिवाय नागपुरातील नाल्यांची वेळेत आणि प्रभावी सफाई करणे, पाणी तुंबण्याच्या समस्या टाळणे, तसंच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये या संदर्भातील सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितलं, "जर आवश्यक असल्यास सीएसआर फंडातून यंत्र घेण्यात घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष भेट देऊन सर्व सफाई अभियानाची पाहणी करणार आहे. नदी नाले सफाईसोबत लगतच्या सुरक्षा भिंतीच्या दुरुस्ती करण्याबाबतही चर्चा करण्यात आली."
आयुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी : आयुक्तांनी धंतोली झोन, गांधीबाग झोन आणि लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या नदी, सफाई अभियानाची प्रत्यक्ष पाहणी केली. आयुक्तांनी बैद्यनाथ चौक, तुळशीबाग चौक, रेशमीबाग चौक, जुना बगडगंज, कुंभारटोली परिसरातील नदी नाले सफाईची स्थिती जाणून घेतली. तसंच नाग नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून साफसफाईच्या कामांची स्थिती जाणून घेतली. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नदी नाले सफाईसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सूचना केल्या आहेत. सफाई अभियानांतर्गत नदीपात्रातून निघणाऱ्या मातीचा उपयोग वृक्षारोपणासाठी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. माती ही रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये लावण्यात येणाऱ्या वृक्षारोपणासाठी वापरावी असे निर्देशही आयुक्तांनी संबधित विभागाला दिले.
हेही वाचा -

