फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकेल, नितेश राणेंनी स्पष्टच सांगितलं
देवगडमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि तालुक्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांची गरज असल्याचे नमूद करत नितेश राणेंनी देवगड स्पोर्ट्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले.


Published : August 31, 2026 at 5:28 PM IST
सिंधुदुर्ग - मिठमुंबरी बीचवर देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित फिशिंग टूर्नामेंटमुळे तालुक्याचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर पोहोचण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय. पारंपरिक कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन अशा साहसी आणि नावीन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन सातत्याने झाल्यास पर्यटकांसह क्रीडारसिकांचे आकर्षण वाढेल, असे ते म्हणाले.
नितेश राणेंकडून देवगड स्पोर्ट्स क्लबच्या कार्याचे कौतुक : देवगडमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि तालुक्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांची गरज असल्याचे नमूद करत नितेश राणे यांनी देवगड स्पोर्ट्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले. ललित चांदोस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्लबच्या माध्यमातून पहिल्याच आयोजनात उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. 'Say No to Drugs'चा संदेश देत तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून क्रीडा क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स आणि स्थानिक मच्छीमार तरुणांना व्यासपीठ देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शासन सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सर्व मासे 'कॅच अँड रिलीज' पद्धतीने पुन्हा समुद्रात सोडले : या स्पर्धेत 4.740 किलो वजनाच्या वाघळी माशासाठी समीर लाड यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. 3.300 किलोच्या माशासाठी मंदार रेगे यांनी द्वितीय, तर 2.380 किलोच्या माशासाठी नयन सुतार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेतील पहिली पकड ललित परब यांनी, शेवटची पकड तोडणकर यांनी, तर सर्वाधिक चार पकडी करण्याचा विक्रम अनंत सावंत यांनी केला. विशेष म्हणजे समुद्री जीवसृष्टीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे भान राखत पकडलेले सर्व मासे 'कॅच अँड रिलीज' पद्धतीने पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश राणे, बाळा खडपे, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, योगेश चांदोसकर, देवगड जामसंडे, नगरपंचायत सभापती तन्वी चांदोस्कर, बुवा तारी, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली, सरपंच महेश ताम्हणकर, मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर, क्लबचे अध्यक्ष ललित चांदोरकर, किरण पाटील, सोहम पारकर, चिन्मय खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.
हेही वाचाः

