ETV Bharat / state

नवीन वर्षाची पार्टी महागात! लघुशंकेसाठी गेलेला तरूण ४०० फूट दरीत कोसळला, रेस्क्यू टीममुळे वाचला जीव

नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता कास मार्गावर गेलेला तरुण डोंगराच्या कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळून गंभीररित्या जखमी झाला. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमनं त्याची दरीतून सुटका केली.

Young man fell into  400 foot deep gorge
रेस्क्यू टीम (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 1, 2026 at 11:58 AM IST

|

Updated : January 1, 2026 at 2:41 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा - सरत्या वर्षाच्या पार्टीसाठी कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये गेलेला तरुण बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महादरे-यवतेश्वर येथील डोंगर कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळला. या घटनेनंतर शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमनं चार तास जंगलातून पायपीट करत घटनास्थळ गाठून बचाव मोहीम राबवली. जखमी तरूणाला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरीतून वर आणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. आदित्य कांबळे (रा. माहुली, सातारा), असं दरीत कोसळलेल्या तरूणाचं नाव आहे.



तोल जाऊन दरीत कोसळला- शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे अध्यक्ष चंद्रसेन पवार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये सरत्या वर्षानिमित्त माहुलीतील आदित्य कांबळे हा तरूण पार्टीसाठी गेला होता. लघुशंकेसाठी बाहेर गेल्यानंतर तोल जाऊन तो महादरे-येवतेश्वर डोंगराच्या कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जंगलातून पाच किलोमीटर पायपीट करत घटनास्थळ गाठले.



दोन्ही पाय फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर दुखापत - दरीत कोसळलेला तरूण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्याच्यावर वैद्यकीय उपचाराखाली असून त्याला वेळेत मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. कडाक्याच्या थंडीतदेखील रात्रभर बचाव मोहीम राबवत रेस्क्यू टीमनं जखमी तरूणाला महादरेच्या दिशेनं बाहेर काढले. रूग्णवाहिकेतून तरूणाला तातडीनं सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


पार्टी बेतली असती जीवावर शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने थरारक बचाव मोहीम राबवत आदित्य कांबळे या तरूणाला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढल्याची भावना साताऱ्यात व्यक्त होत आहे. रेस्क्यू टीमच्या तत्परता, धैर्य आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना उत्साहाला आवर घातला नाही तर जीवावर कसे बेतू शकते, हे या घटनेतून पाहायला मिळाले. सरत्या वर्षाच्या पार्टीला जाणे त्या तरूणाच्या जीवावर बेतले असते. मात्र, आश्चर्यकारकरित्या तो बचावला आहे.

हेही वाचा-

Last Updated : January 1, 2026 at 2:41 PM IST