ETV Bharat / state

'हुरडा पार्टी'तून शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती! 4 महिन्यांत 7 लाखांची कमाई; ग्रामीण पर्यटनालाही चालना

थंडीत गरमागरम ज्वारीचा हुरडा, बाजरीची भाकर, पिठलं, कांदा आणि भाजी असा अस्सल मराठमोळा बेत परिसरातील लोकांना आकर्षित करत आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत आहे.

hurda party
हुरडा पार्टी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 11:55 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी (अहिल्यानगर) : सध्या ज्वारीचं पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरताना दिसत आहे, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पिकातून मोठा दिलासा मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात ज्वारीच्या हुरड्याला मागणी वाढली आहे. या परिसरा हुरडा पार्ट्यांचा ट्रेंड झपाट्यानं वाढताना दिसत आहे. या हुरडा पार्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती तर होत आहेच, त्याबरोबरच ग्रामीण पर्यटनालादेखील चालना मिळाली आहे.

हुरडा पार्टी (ETV Bharat)

गुलाबी थंडीत हुरडा पार्टी : गुलाबी थंडीच्या दिवसांत गरमागरम ज्वारीचा हुरडा, बाजरीची भाकर, पिठलं, कांदा आणि भाजी असा अस्सल मराठमोळा बेत परिसरातील लोकांना आकर्षित करत आहे. अशा स्थितीत ग्रामीण तसेच शहरी भागातील खवय्यांची मोठी गर्दी हुरडा केंद्रांवर होत आहे. गावरान चवीचा आस्वाद घेण्यासाठी लहान मुलं, युवक आणि वृद्ध नागरिकही आवर्जून उपस्थित हुरडा केंद्रांवर गर्दी करत आहेत.

hurda party
हुरडा पार्टी (ETV Bharat)

आजच्या धकाधकीच्या जीवनात शेतात किंवा माळरानावर गावरान पद्धतीनं जेवणाचा अनुभव घेण्याची संधी फारच कमी मिळते. पूर्वी जवळपास प्रत्येक शेतात सहज उपलब्ध असलेला ज्वारीचा हुरडा आता दुर्मीळ होत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं हुरडा उपलब्ध करून देणाऱ्या ठिकाणांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. हॉटेल, ढाबे आणि फास्टफूडच्या रोजच्या जेवणाला कंटाळलेले अनेक खवय्ये नैसर्गिक वातावरणात मिळणाऱ्या हुरड्याकडं आकर्षिक होताना दिसत आहेत.

hurda party
हुरडा पार्टी (ETV Bharat)

वाढदिवस, स्नेहमेळाव्यांमध्ये हुरडा पार्टीचा ट्रेंड : गुलाबी थंडीत निखाऱ्यावर भाजलेली ज्वारीची कणसं खाण्याची मजा काही औरच असते. या अनोख्या अनुभवासाठी वाढदिवस, कुटुंबीयांचे स्नेहमेळावे, सहली किंवा इतर खासगी कार्यक्रमांसाठी हुरडा पार्टी देण्याचा नवा ट्रेंड उभा राहिला आहे. या ट्रेंडमुळे हुरडा केंद्रांवर केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नाही तर राज्याच्या विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. विशेषतः उच्चभ्रू कुटुंबातील हुरडा शौकिनांची उपस्थिती लक्षणीय आहे.

शेतकऱ्यांना चांगला नफा : पारंपरिक शेती पद्धतीत शेतकऱ्यांना बाजारभावावर अवलंबून राहावं लागतं, परंतु प्रत्येक शेतकऱ्याला आपला माल स्वतः ठरवलेल्या किमतीवर विकता यावा, अशी अपेक्षा असते. याच विचारातून नेवासा तालुक्यातील कुंडलिकराव भांगे यांनी अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कडेला सर्वप्रथम हुरडा विक्रीस सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, आज अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी हुरडा ज्वारीची लागवड करून थेट विक्री करून चांगला नफा कमावत आहेत.

सध्या कच्च्या ज्वारीच्या कणसाला सुमारे 400 रुपये किलोपर्यंत दर मिळत असून यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आहे. हुरड्यासोबतच शेतातच पिकवलेलं निखाऱ्यावर भाजलेले स्वीट कॉर्न, उसाचा रस, बोरे आदी पदार्थांची विक्री केली जात आहे. यामुळे ग्राहकांना विविध पारंपरिक चवींचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे.

हुरडा पार्ट्यांना व्यावसायिक स्वरूप : पिझ्झा, बर्गर आणि फास्टफूडकडे झुकलेल्या आजच्या पिढीला रानमेव्याची आणि पारंपरिक अन्नसंस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हुरडा पार्ट्यांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं आहे. अनेक शेतकरी आता थेट आपल्या शेतातच हुरडा पार्ट्या आयोजित करत असून यामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळत आहे. परिणामी, ज्वारीचा हुरडा केवळ खाद्यपदार्थ न राहता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं महत्त्वपूर्ण साधन ठरत आहे.

hurda party
हुरडा पार्टी (ETV Bharat)

4 महिन्यात 6 ते 7 लाख रुपये निव्वळ नफा : हिवाळा सुरू झाल्यानंतर हुरडा पार्टीला सुरुवात होते. साधारणतः 25 नोव्हेंबरपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत हा हंगाम चालतो. या चार महिन्यांच्या कालावधीत हुरडा पार्टीतून अंदाजे 12 ते 13 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. यापैकी सुमारे ५० टक्के रक्कम खर्चासाठी जाते. त्यामुळे या कालावधीत साधारण 6 ते 7 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.

गुजरात राज्यात ‘सुरखी’ नावाच्या ज्वारीची लागवड शेतकरी करतात. ही ज्वारी विशेषतः हुरड्यासाठीच प्रसिद्ध आहे. सध्या ज्वारीचं पीक घेतलं तरी अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे आम्ही फक्त आमच्या शेतात सुरखी ज्वारीचीच लागवड करतो.

25 नोव्हेंबरपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत हे ज्वारीचं पीक शेतातच राहतं. त्यामुळे ज्वारीचे दाणे चांगले भरतात आणि हुरड्यासाठी उत्तम उत्पादन मिळते, अशी माहिती हुरडा पार्टी आयोजक शेतकरी भरत पुंडलिक भांगे यांनी दिली आहे.

हेही वाचा