ETV Bharat / state

निवडणूक प्रचाराच्या साहित्यांवर मकरसंक्रांती आणि 'लाडक्या बहिणीं'ची छाप; साडी, मंगळसूत्र, टिकल्या, झुमक्यांना विशेष मागणी

यंदाची महापालिका निवडणूक मकरसंक्रांतीच्या काळात होत असल्यानं प्रचार साहित्यांवर सणाची छाप स्पष्टपणे दिसून येत आहे. मकरसंक्रांतीनिमित्त महिलांकडून वाटल्या जाणाऱ्या ‘वाणा’वरही निवडणुकीचा प्रचार रंगताना दिसत आहे.

Nagpur Municipal Corporation Election Campaign
नागपूर महापालिका निवडणुकीत प्रचाराचा नवा ट्रेंड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 3, 2026 at 10:01 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात आता महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. बदलत्या काळानुसार यंदा प्रचार डिजिटल माध्यमांतून मोठ्या प्रमाणात होणार असला, तरी पारंपरिक प्रचार साहित्यालाही मोठी मागणी आहे.

खरं तर, यंदाची निवडणूक मकरसंक्रांतीच्या काळात होत असल्यानं प्रचार साहित्यांवर सणाची छाप स्पष्टपणे दिसून येत आहे. मकरसंक्रांतीनिमित्त महिलांकडून वाटल्या जाणाऱ्या ‘वाणा’वरही निवडणुकीचा प्रचार रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, प्रचारात महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं असून ‘लाडक्या बहिणीं’साठी खास साहित्य तयार करण्यात आलं आहे.

प्रचारासाठी कार्यकर्त्यांना थंडीपासून संरक्षण मिळावं, याचीही काळजी घेण्यात आली आहे. पारंपरिक रुमाल, दुपट्टे आणि टोप्यांसह हुडी, साड्या, टिकल्या, मंगळसूत्र, हळदी-कुंकूचे करंडे अशी विविध प्रचार सामग्री उपलब्ध झाली आहे. एकूणच यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलाभिमुख आणि विशेष स्वरूपाचा ठरणार, हे निश्चित आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीत प्रचाराचा नवा ट्रेंड (ETV Bharat)

लाडक्या बहिणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न : महानगरपालिका निवडणुकीत 50 टक्के महिला आरक्षण लागू असलं, तरी यंदा निवडणूक प्रचार साहित्यावर 100 टक्के महिलांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. प्रचार साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या उमेदवारांकडूनही लाडक्या बहिणींना आकर्षित करणाऱ्या साहित्यालाच सर्वाधिक मागणी आहे.

तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर महानगरपालिका निवडणूक होत असल्यानं इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये महिला उमेदवारांचं प्रमाण लक्षणीय आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला निर्णायक पाठिंबा दिला होता. त्यामुळे ‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीतही महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाचं प्रचार साहित्य महिलांचा विचार करून खास तयार करण्यात आलं असून, लाडक्या बहिणींना केंद्रस्थानी ठेवून प्रचाराची रणनीती आखण्यात आली आहे.

New Trend Nagpur Municipal Corporation Election Campaign
निवडणूक प्रचार साहित्य (ETV Bharat)

डिजिटल युगातही पारंपरिक प्रचार साहित्याची मागणी कायम : सध्याचे युग डिजिटल असलं तरी यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारासाठी डिजिटल माध्यमांवर विशेष भर दिला आहे. दिवसभरात सर्व मतदारांची प्रत्यक्ष भेट शक्य नसल्यानं समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. मात्र, तरीही उमेदवारांना मतदारांपर्यंत ‘डोअर टू डोअर’ पद्धतीने पोहोचणं आवश्यक ठरते.

या प्रत्यक्ष प्रचारासाठी आकर्षक पारंपरिक प्रचार साहित्यांची मोठी गरज असते. मतदारांची भेट घेताना उमेदवार आपल्या नावाचं कॅलेंडर, बिल्ले, पाम्प्लेट तसेच, इतर प्रचार साहित्य वितरित करतात. त्यामुळे डिजिटल प्रचार कितीही प्रभावी असला, तरी पारंपरिक प्रचार साहित्याचे महत्त्व कमी झालेलं नाही. उलट, यंदा पारंपरिक प्रचार साहित्यांच्या मागणीत सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

New Trend Nagpur Municipal Corporation Election Campaign
निवडणूक प्रचार साहित्य (ETV Bharat)

नागपूरच्या थंडीत हुडी आणि साड्यांचही विशेष आकर्षण : नागपुरात थंडीत प्रचार करणं आव्हानात्मक ठरत असताना, नेत्यांचे फोटो असलेली हुडी आणि साड्या प्रचारात आकर्षण ठरत आहेत. मध्य भारतात थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागपूरमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवलं जात आहे. कडाक्याच्या थंडीत कार्यकर्ते घराबाहेर पडण्यास कचरतात, त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारावर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. ही अडचण लक्षात घेऊन उमेदवारांनी आणि पक्षनेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रकारच्या हुडी तयार केल्या आहेत. या हुडी घालून कार्यकर्ते थंडीपासून संरक्षण करत प्रचारात जोमानं सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, यंदा केवळ पुरुष कार्यकर्त्यांचाच नव्हे, तर महिला कार्यकर्त्यांचाही विचार करण्यात आला आहे.

महिला कार्यकर्त्यांसाठी विविध पक्षांची चिन्हे असलेल्या साड्या उपलब्ध करण्यात आल्या असून, या साड्यांना प्रचारात मोठी मागणी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे थंडीच्या पार्श्वभूमीवरही प्रचारात नव्या प्रकारचं साहित्य केंद्रस्थानी आलं आहे.

New Trend Nagpur Municipal Corporation Election Campaign
निवडणूक प्रचार साहित्य (ETV Bharat)

प्रचार साहित्याची सामग्री महागली व मागणी वाढली : प्रचार साहित्याची सामग्री महागली असली तरी त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेक वर्षांच्या विलंबानंतर महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं प्रचार साहित्य व्यवसायाला पुन्हा चालना मिळाली आहे. मधल्या काळात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका झाल्यामुळे या व्यवसायात काही प्रमाणात गती आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचार साहित्याच्या किमतींमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असं असतानाही उमेदवारांच्या उत्साहात कोणतीही घट झालेली दिसत नाही.

अपक्ष उमेदवारांना आज चिन्हांचं वाटप होणार असून, त्यानंतर प्रचार साहित्य मिळणंही कठीण होईल, असा अंदाज अनेक प्रचार साहित्य विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा